नाशिक : शिक्षकांच्या बदल्या होणार सॉफ्टवेअरवर!

शिक्षकांची ४० कलमी माहिती संकलनाला वेग : बदली प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप नाही
Teachers will replaced software transfer process No interference
Teachers will replaced software transfer process No interference

इगतपुरी : जिल्हा परिषदांतर्गत राज्यभरात कार्यरत असलेल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया पारदर्शक, वेगाने करण्यासाठी आता राज्य सरकारमार्फत सॉफ्टवेअरचे काम आता अंतिम टप्यात आले आहे. एप्रिलअखेरपर्यंत ते पूर्ण होणे अपेक्षित आहे. यामुळे मेपासून बदल्यांची प्रक्रिया या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एका ‘क्लिक’वर होणार आहे.

सॉफ्टवेअरच्या निर्मितीसाठी राज्य सरकारने पुणे, सातारा आणि वर्धा येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. सॉफ्टवेअरमुळे आता बदल्यांची किचकट प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे. बदल्यांसाठी प्रत्येक शिक्षकाकडून ४० कलमी, २० कलमी व मेल आयडी, आधार नंबर, शालार्थ व सरल आयडी यांची माहिती संकलित करून खात्री करण्याच्या कामाला वेग आला आहे.

जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनेकदा घोळ होत असल्याच्या तक्रारी वा आरोप होत असतात. या बाबींची दखल घेऊन राज्य शासनाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. त्या समितीने राज्य सरकारला बदली प्रक्रिया कशा पद्धतीने राबविता येईल, या शिफारशींचा अहवाल दिला होता. शिफारशीनुसार सरकारमार्फत तयार करण्यात येणारे हे सॉफ्टवेअर मराठी व इंग्रजीत आहे. हे सॉफ्टवेअर संगणकासह मोबाईलद्वारे वापरता येणार आहे. त्याद्वारे संपूर्ण प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यासाठी अवघ्या तीन सेकंदाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

प्रत्येक शिक्षकाला एकमेकांची माहिती सॉफ्टवेअरद्वारे सहज पाहता येणार आहे; तसेच दुसऱ्या शिक्षकाची माहिती दुरुस्ती करण्याची सूचना अथवा आक्षेपदेखील नोंदविता येणार आहेत. सर्व शिक्षक आणि अधिकाऱ्यांना डॅशबोर्ड दाखवले जातील. सॉफ्टवेअरमध्ये सर्व माहिती दाखविली जाणार आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांनी त्यांच्या आधार क्रमांकापासून ते वैयक्तिक माहिती अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

असे आहे सॉफ्टवेअर

प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत सॉफ्टवेअरची भूमिका महत्त्वाची असेल. त्यामुळे सुरक्षितता, उपयुक्तता आणि जबाबदारी ही या सॉफ्टवेअरची वैशिष्ट्ये असतील. कोणत्याही शिक्षकाला एका वेळी एकाच मोबाइल अथवा डिव्हाइसवरून लॉग इन करता येईल. प्रत्येक लॉग इन करणाऱ्या व्यक्तीचा लॉग इनमध्ये ‘आयपी’ आणि ‘लॉग इन’ सेव्ह होईल. या सॉफ्टवेअरमध्ये भरलेली माहिती दुरुस्त करणे शक्य होईल. एखाद्या व्यक्तीने भरलेल्या माहितीमध्ये बदल केल्यास तो बदल कधी आणि कोणी व्यक्ती अथवा अधिकाऱ्याने केला हे सहज कळणार आहे. प्रत्येक माहिती अद्ययावत करताना सहा अंकी ‘ओटीपी’ द्यावा लागणार आहे. या बदली प्रक्रियेत कोणत्याही अधिकाऱ्यास हस्तक्षेप करण्यास संधी नाही.

''शिक्षकांची बदली प्रक्रिया वेगाने आणि पारदर्शकपणे राबविता यावी, याकरिता सॉफ्टवेअरची रचना कशी असावी, त्यात कोणते पर्याय निवडले जावेत, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची समिती स्थापन झाली आहे. एप्रिलअखेर हे सॉफ्टवेअर तयार होणे अपेक्षित आहे. नियमानुसार नव्या बदल्या सॉफ्टवेअरद्वारेच करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी शिक्षकांकडून आलेल्या प्रत्येक माहितीची आम्ही जिल्हा व तालुकापातळीवर खातरजमा करून घेत आहोत.''

- राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com