तापमानाचा पारा पुन्हा घसरला; थंडीत वाढ
पहाटेच्या गारव्यामुळे उबदार कपड्यांचा वापर वाढला
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर आता थंडीचा प्रभाव जाणवू लागला असून, शहराच्या तापमानात पुन्हा घसरण झाली आहे. तापमान पारा १२ ते १३ अंशांपर्यंत आले असून, सरासरीपेक्षा २.६ अंशांनी कमी आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी वातावरणात गारठा वाढला असून, नागरिकांना थंडीचा अनुभव येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडीची चाहूल लागली होती. त्यानंतर काही दिवस तापमानात वाढ झाल्याने थंडीचा प्रभाव कमी झाला होता. मात्र, आता पुन्हा किमान तापमानात घट झाल्याने थंडीने जोर धरला आहे. विशेषतः पहाटेच्या वेळी घराबाहेर पडणारे नागरिक स्वेटर, जॅकेट, शाल आणि मफलरचा वापर करताना दिसत आहेत.
उबदार कपड्यांचा आधार
शहरातील महात्मा गांधी उद्यान, भाऊंचे उद्यान, लांडोरखोरी उद्यान तसेच विविध खुल्या मैदानांमध्ये सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या कायम आहे. मात्र, सकाळच्या गारव्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि नियमित व्यायाम करणाऱ्यांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
चौकट
दिवसा उन्हाचा चटका, रात्री गारवा
सध्या शहरात दिवसा उन्हाचा प्रभाव जाणवत असला, तरी सकाळी आणि रात्री तापमानात घट होत असल्याने वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. दुपारी उन्हामुळे उकाडा जाणवतो, तर सूर्यास्तानंतर वातावरणात गारवा वाढतो. त्यामुळे नागरिकांना दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या हवामानाचा अनुभव येत आहे.