टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने
९ लाखांची बाईक पळवली
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका तरुणाची फेसबुक मार्केट प्लेसवरून संपर्क साधलेल्या भामट्याने ९ लाख रुपये किमतीची महागडी स्पोर्ट्स बाईक टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने लांबवल्याची घटना घडली आहे. भाभानगर येथील सम्राट न्यूक्लीयस अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये रविवारी (ता. १) सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साईम नाजीम शेख (२१, रा. हुसेनी टॉवर, पखाल रोड, अशोका मार्ग) याच्या फिर्यादीनुसार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी मोहमंद हनीफ नुरुद्दीन बुरूनकर यांच्या नावे असलेली कावासाकी झेड-900 मोटारसायकल (एमएच ०८ बीएफ ११२६) विक्रीसाठी फेसबुक मार्केट प्लेसवर जाहिरात टाकली होती.
रविवारी सायंकाळी फिर्यादीच्या बिल्डिंगमधील ओळखीतून वा संपर्कातून एका संशयित इसमाबाबत माहिती मिळाली. त्यानुसार साईम शेख हे बाईक घेऊन सम्राट न्यूक्लीयस अपार्टमेंटजवळ पोहोचले. तिथे त्यांना अंदाजे २५ वर्षे वयाचा एक अनोळखी इसम भेटला. दोघांमध्ये ९ लाख ७५ हजार रुपयांत व्यवहार ठरला. संशयिताने टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असल्याचे सांगितले व टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने गेलेला इसम अर्धा तास उलटूनही परत आला नाही. फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी शोधाशोध केली, परंतु तो मिळून आला नाही. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्याद दिली. हवालदार कुलथे तपास करीत आहे.