esakal | निवडणुकीत छोटा कार्यकर्ता केंद्रस्थानी
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

निवडणुकीत छोटा कार्यकर्ता केंद्रस्थानी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी संघटनेतील तळागाळातील घटक असलेल्या छोट्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे. त्यांना बळ देताना महापालिकेवर झेंडा फडकवण्याचे स्वप्न बाळगले आहे. त्यामुळे किमान सहा महिने तरी या कार्यकर्त्यांचे महत्त्व पक्षांमध्ये टिकून राहणार असल्याचे दिसून येत आहे.

पुढील वर्षाच्या प्रारंभी महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकी होणार आहे. साडेचार वर्षात सत्ताधारी व विरोधी पक्षांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर मतदान होईल. त्यासाठी राजकीय पक्ष सज्ज झाले असून, मतदारांसमोर जायचे असेल तर त्यासाठी संघटना बळकट करावी लागणार ही बाब जाणून घेत पक्षातील छोट्या कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम सुरू झाले आहे. राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना व भाजपने त्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसच्या गोटात अद्यापही शांतता आहे.

शाखाप्रमुख शिवसेनेची ताकद

शिवसेनेच्या शाखा व त्या शाखेचा प्रमुख ही शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी शिवसेनेच्या शाखा उघडण्याबरोबरच शाखाप्रमुखाला बळ देण्याचे काम शिवसेनेकडून सुरू झालेले आहे. आत्तापर्यंत शहरात शंभरहून अधिक शाखांचे उद्‌घाटन करण्यात आले आहे. त्याशिवाय आठवड्याला शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी नाशिकमध्ये तळ ठोकून संघटना बळकटीवर लक्ष देत आहे.

हेही वाचा: बोलाचा भात अन् बोलाचीच कढी.. राज्य सरकारचे पितळ उघडे!

काँग्रेसच्या तंबूत सन्नाटा

महापालिका निवडणूक जवळ आली असताना सर्वच पक्षांचे प्रमुख नेते नाशिक कडे लक्ष ठेवून आहे. मात्र, एकेकाळी गल्ली पासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या काँग्रेसमध्ये अद्यापही सन्नाटा आहे. काँग्रेस पक्षाच्या तळातील कार्यकर्त्यांशी कुठलाही संवाद साधला जात नसल्याने नाराजीचे वातावरण आहे. याउलट निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये वाद अधिक उफाळून येत असल्याचे दिसून येत आहे.

आपची गोगलगाय चाल

शहरात आम आदमी पक्षाची ताकद नगण्य असली तरी पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वृक्षतोड, पर्यावरण, शिक्षण, रस्ते, कोरोनाकाळातील नागरिकांना झालेला त्रास आदी मुद्द्यांच्या आधारे नागरिकांसमोर जात आहे.

राष्ट्रवादीकडून बूथ कमिटी सक्षम

राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिका निवडणुका केंद्रित करताना बूथ कमिटी सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीन दिवसाच्या दौऱ्यात शहर कार्यकारिणीला बूथ कमिट्या सक्षम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बूथ कमिट्यांच्या माध्यमातून पक्षाचे विचार, ध्येय, धोरण तळागाळापर्यंत पोचविण्याचे आवाहन केले आहे. बूथ कमिटीत पक्षाचे सदस्य महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांना महत्त्व आले आहे.

मनसे शाखाध्यक्ष ठरणार महत्त्वाचे

एकेकाळी महापालिकेत सत्तेत असलेल्या मनसेने २०१७ च्या पराभवानंतर आता २०२२२ च्या निवडणुकीमध्ये पक्षाला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी संघटनेकडे लक्ष केंद्रित केले आहे. मनसेच्या सत्ताकाळात सीएसआर ऍक्टिव्हिटीमधून झालेल्या प्रकल्पांची माहिती लोकांपर्यंत पोचविणे, याबरोबर सत्ताधारी भाजपने प्रकल्पांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे झालेली वाताहात मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी १२२ शाखा अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. शाखाध्यक्ष हाच महत्त्वाचा घटक मानला जाईल, अशा सूचना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

हेही वाचा: नाशिक-पुणे हायवेवरील शिंदे टोलनाका होणार बंद? गडकरी सकारात्मक

भाजपमध्ये संवादाचा सूर

महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपनेदेखील आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून संघटना बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी सहा मंडल अध्यक्ष होते, त्यात आता वाढ करून १० मंडल अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. मंडल अध्यक्षांच्या माध्यमातून पक्षाच्या सदस्य बरोबरच नागरिकांशीदेखील संवाद साधला जात आहे. नागरिकांशी संवाद साधताना केंद्र सरकारने केलेल्या योजना व नाशिकसाठी केंद्र सरकारमार्फत आणलेल्या योजना लोकांपर्यंत पोचविली जात आहे.

loading image
go to top