esakal | पीपीई किट घालून रेमडेसिव्हिर इंजेक्शन चोरी! सीसीटीव्हीत प्रकार उघड
sakal

बोलून बातमी शोधा

ppe kit

पीपीई किट घालून रेमडेसिव्हिर इंजेक्शन चोरी! सीसीटीव्हीत प्रकार उघड

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : एकीकडे रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे नागरिक हैराण आहे, दुसरीकडे अशा धक्कादायक घटना घडत आहे. नाशिकमध्ये अशीच एक घटना घडली. दोन वॉर्डबॉयसह तिघांनी दोन रेमडेसिव्हिर इंजेक्शन चोरल्याची घटना नाशिकच्या एका रुग्णालयात घडली.

सीसीटीव्हीत धक्कादायक प्रकार उघड

नाशिकच्या श्री गुरुजी रुग्णालयातील प्रशासन अधिकारी पूनम बेलगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रुग्णालयातील नर्सिंग काउंटरवरून रविवारी (ता. १८) सकाळी दहाच्या सुमारास चोरट्याने दोन इंजेक्शन चोरली. त्यानुसार गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली. सीसीटीव्ही पाहणीत चोरट्याने पीपीई किट घालून दोन इंजेक्शन चोरल्याचे दिसून आले. चोरट्याच्या चालीवरून पोलिसांनी संशयित विकीला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने चोरी केल्याची कबुली दिली. तसेच सागर, गणेश यांच्या मदतीने चोरी केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दहा हजार ८०० रुपयांचे दोन इंजेक्शन जप्त केले. चोरलेले इंजेक्शन विक्री करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या तिघांविरोधात चोरीसह आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

तासाभरात तिघांना अटक

दोन वॉर्डबॉयसह तिघांनी दोन रेमडेसिव्हिर इंजेक्शन चोरल्याची घटना श्री गुरुजी रुग्णालयात घडली. गंगापूर पोलिसांनी तपास करून तासाभरात तिघांना अटक केली. वॉर्डबॉय विकी वरखडे, शस्त्रक्रिया विभागातील मदतनीस सागर मुटेकर व वॉर्डबॉय गणेश बत्तीसे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.