
Nashik Bribe Crime : बारचालकांकडून हप्ते वसुली करताना एक्साईजचे तिघे लाचखोर जेरबंद
नाशिक : निफाड येथील येवला रोडवरील बार चालकाकडून ९ हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यासह दोघा खासगी व्यक्ती अशा तिघांना रंगेहाथ अटक करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदरील कारवाई केली असून, निफाड पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Three Excise Bribes Jailed While Collecting Fees From Bar Operators Nashik Bribe Crime news)
लोकेश संजय गायकवाड (३५, रा. नाशिक) या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यासह बारचालकांकडून वसुलीसाठी मध्यस्थी असलेले पंडित रामभाऊ शिंदे (६०), प्रवीण साहेबराव ठोंबरे (४७, दोघे रा. निफाड) असे तिघा लाचखोरांची नावे आहेत. हॉटेल व्यवसायिक असलेल्या तक्रारदार यांचे येवला रोडवर तीन बार ॲण्ड रेस्टॉरंट आहेत.
बार ॲण्ड रेस्टॉंरटची तपासणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून केली जात असते. या नियमित तपासणीमध्ये हॉटेल्समधील कामाच्या त्रुटी न काढण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील जवान लोकेश गायकवाड व वसुलीसाठी मध्यस्थी असलेले दोघे खासगी व्यक्ती संशयित शिंदे व ठोंबरे यांनी एका हॉटेलचे ४ हजार रुपये प्रमाणे गेल्या ३ फेब्रुवारी रोजी मागणी केली होती. तडजोडी अंती तीन हॉटेलचे मिळून ९ हजार रुपये देण्याचे ठरले.
हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली
दरम्यान, याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने शहानिशा केल्यानंतर, सोमवारी (ता. ६) रात्री निफाड येथे सापळा रचला. ९ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचा जवान गायकवाड, शिंदे व ठोंबरे आले असता, लाचेची रक्कम स्वीकारताना तिघांना रंगेहाथ अटक केली.
याप्रकरणी निफाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, प्रभाकर गवळी, प्रफुल्ल माळी, नितीन कराड, परशराम जाधव यांच्या पथकाने सदरची कारवाई केली.