
Nashik : फसवणूक करणाऱ्या 3 महिलांना 3 वर्ष कारावास
नाशिक : महिलांचे बचतगट स्थापन करण्याचे सांगत दीड टक्के व्याजदराने कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून महिलांकडून आठ लाख ४७ हजार रुपये जमवून त्यांची फसवणूक (fraud) केल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यातील तीन महिला आरोपींना तीन वर्ष सश्रम कारावास (Rigorous imprisonment) आणि चार लाख ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. (Three women jailed for cheating three years Nashik Crime News)
सुरेखा रमेश वाघ, संगीता रामचंद्र पवार (दोघे रा. राजवाडा, सातपूर) आणि कविता पवार (रा. आरटीओ कॉर्नर), असे आरोपी महिलांची नावे आहेत. संबंधितांनी नोव्हेंबर २००७ ते २५ सप्टेंबर २००८ या काळामध्ये नाशिक रोड भागात राहणाऱ्या महिलांना त्यांचा बचतगट स्थापन करत दीड टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून कर्ज मंजूर करण्यासाठी एक ते पाच हजार रुपये याप्रमाणे फिर्यादीकडून आठ लाख ४७ हजार ५०० रुपये जमा करत सर्व महिलांची फसवणूक केली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात तिन्ही महिलांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षक ई. के. पाडळी यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करत दोषारोपपत्र न्यायदंडाधिकारी यांच्याकडे सादर केले होते.
१३ मेस या प्रकरणाची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. डी. कर्वे यांच्याकडे झाली. फिर्यादी, पंच, साक्षीदारांनी दिलेली साक्ष, तपासी अधिकारी यांनी सादर केलेले सबळ पुराव्यावरून न्यायदंडाधिकारी यांनी याप्रकरणातील तिन्ही महिला आरोपींना तीन वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी दीड लाख रुपये अशी चार लाख ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे ॲड. सायली गोखले यांनी कामकाज पाहिले.