Latest Marathi News | गंगापूर रोडवर रंगला सराफाच्या कर्मचाऱ्यांना लुटण्याचा थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Crime Update : गंगापूर रोडवर रंगला सराफाच्या कर्मचाऱ्यांना लुटण्याचा थरार

नाशिक : गेल्याच महिन्यात चांदीची लुट केल्याचा प्रकार घडलेला असताना, रविवारी (ता.२५) रात्री गंगापूर रोडवरील ओढेकर ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यांचा पाठलाग करून लुटण्याचा प्रयत्न झाला. यावेळी कर्मचाऱ्यांनी दुचाकी न थांबविल्याने संशयितांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि त्यांच्याकडील बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न केला.

मात्र कर्मचाऱ्यांनी थेट सरकारवाडा पोलिस ठाणे गाठल्याने संशयित पसार झाले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुना गंगापूर नाका येथे ओढेकर ज्वेलर्स हे दुकान आहे. या सराफी पेढीचे व्यवस्थापक विनोद धनजीभाई कटोरिया (४३, रा. जेलरोड) व त्यांचे सहकारी विजय प्रभाकर वावरे (३४, रा. परदेशीवाडा, जुने नाशिक) हे दोघे रविवारी (ता.२५) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दुकान आवरून दुचाकीवरून निघाले.(thrill of robbing by chasing to odhekar jewellers employees on Gangapur Road Nashik Crime Latest Marathi News)

हेही वाचा: नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला; NMC Electionमुळे मंडळांकडून विविध उपक्रम

त्याचवेळी विद्या विकास सर्कलकडून दोघे संशयितांनी दुचाकीवरून या कर्मचाऱ्यांचा पाठलाग करीत आले, आणि शंकराचार्य संकुलाजवळ संशयितांनी या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत थांबण्यास सांगितले. मात्र या कर्मचाऱ्यांनी दुचाकी न थांबविल्याने संशयितांनी कटोरिया यांच्याकडील गळ्यात अडकविलेली काळ्या रंगाची बॅग धावत्या दुचाकीवरून हिसकावण्याचा प्रयत्न केला.

मात्र कटोरिया जुमानत नसल्याचे लक्षात येताच संशयितांनी त्यांच्याकडील मिरची पूड कटोरिया व वावरे यांच्या डोळ्यांच्या दिशेने फेकली. सुदैवाने कटोरिया यांच्या डोळ्यावर चष्मा असल्याने त्यांना फारसा त्रास झाला नाही मात्र, वावरे यांच्या डोळ्यात मिरची पूड गेल्याने त्यांना त्रास होऊ लागला. परंतु, तशाही स्थितीत दुचाकी न थांबविता त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना आपबिती सांगितली.

घटनेची माहिती मिळताच दुकान मालक हर्षवर्धन ओढेकर यांनी पोलीस ठाणे गाठले. दोघा कर्मचाऱ्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, याप्रकरणी अज्ञात संशयितांविरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Navratrotsav 2022 : महामार्ग ते गडकरी सिग्नल मार्गावरील वाहतूक मार्गात बदल