पुणे सरळ रेल्वेमार्गासाठी
सर्वपक्षीय बैठक उद्या
नाशिक रोड, ता. २४ : गेल्या ३० वर्षांपासून नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाची मागणी नागरिकांकडून सातत्याने केंद्र सरकारकडे करण्यात येत आहे. या मागणीसाठी अनेकदा सर्वेक्षणेही करण्यात आली. मात्र, रेल्वे मंत्रालयाने सरळ नाशिक-पुणे मार्गाऐवजी नाशिक- शिर्डी- अहिल्यानगरमार्गे पुणे असा नवीन रेल्वेमार्ग प्रस्तावित केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. २६) सर्वपक्षीय बैठक होईल.
या मार्गाची कोणतीही लोकमागणी नसताना हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. प्रस्तावित मार्गामुळे हजारो विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, उद्योजक आणि व्यावसायिकांवर अन्याय होणार असून, हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्याही तोट्यात जाण्याची शक्यता असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. २९) प्रस्तावित रास्ता रोको आंदोलनाबाबत चर्चा करून पुढील भूमिका निश्चित करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक शुक्रवारी सकाळी दहाला नाशिक रोड येथील सिन्नर फाटा परिसरातील शेतकरी संकुल, व्यापारी बँकेच्या वरच्या सभागृहात होईल. बैठकीस सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांनी पक्षभेद विसरून उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक अशोकराव खालकर, रमेश औटे, मधुकर सातपुते, रतन जाधव, केशव पोरजे, पंडित आवारे, प्रशांत दिवे, बाजीराव भागवत, शिवाजी हांडोरे, नंदू सोनवणे, सुदाम बोराडे, संतोष साळवे, योगेश भोर, विजय जाधव, बबनराव कांगणे, गोरखनाथ बलकवडे, उत्तमराव सहाणे, बबनराव मानकर, अशोकराव ठुबे, नितीन खर्जुल, राहुल ताजनपुरे आणि विक्रम कोठुळे यांनी केले आहे.