पोळा विशेष पान-४
CHH26B02908---CHH26B02909
चिचोंडी बुद्रुक (ता.येवला) : येथील प्रमोद घोटेकर, अभिजित राजगुरू यांच्या जिगरबाज मालकीचा जिल्ह्यात लौकिक असलेला पांढरा शुभ्र देखणा अर्जुन बैल
---------------------
शर्यतीचे मैदान गाजवितो ‘अर्जुन ०७’!
----------------
आहारावर महिन्याला दहा हजार खर्च, बसायला मॅट, शेंगदाणा, उडीद डाळ आणि गव्हाचा खुराक
----------------
प्रमोद पाटील ः सकाळ वृत्तसेवा
चिचोंडी, ता. ९ : पोळा सण म्हटल्यावर शेतकऱ्यांचा बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा वार्षिक उत्सव, मात्र हा सण साजरा करत असताना काही बैल किंवा गोऱ्हे आपल्या रुबाबदार आणि बादशाही कामगिरीने बैलांमध्ये उठून दिसतात. येथील प्रमोद घोटेकर, अभिजित राजगुरू यांचा ‘अर्जुन 07’ हा त्यातीलच एक. दिसायला पांढराशुभ्र देखणा आणि राजबिंडा असा हा दोन वर्ष वयाचा गोऱ्हा येवला तालुक्यासह नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, चांदवड, निफाड, सिन्नर, वैजापूर या भागात सर्वांच्या परिचयाचा बनला आहे.
-------------
अर्जुनला गोठ्यात बसायला मॅट असून खाद्याचे विशिष्ट वेळापत्रक निश्चित कऱण्यात आले आहे. त्यानुसारच पोषक आहार दिला जातो. अंगात ताकद मिळावी म्हणून त्याला पेंड, सरकी, भिजवलेले दाणे आणि गुळ-पाणी दिले जाते. गोठ्यात पूर्णतः स्वच्छता ठेवली जाते. त्याला डास किंवा माश्या चावू नयेत म्हणून गोठ्यात कडुनिंबाच्या पानांचा धूर केला जातो. प्रसंगी फॅन लावला जातो. उन्हाळ्यात ऊन लागू नये आणि हिवाळ्यात थंडी पासून बचाव व्हावा अशी सोय केली आहे. अर्जुनला महिन्याच्या खुराक मध्ये उडीद डाळ ३० किलो, शेंगदाणा पेंड २० किलो, गहू २५ ते ३० किलो, गूळ १० किलो, सोयाबीन तेल ५ ते ६ किलो तसेच कोरडा चारा, मुरघास, गवत, मका असे मिळून महिन्याकाठी दहा हजार रुपये एकट्यावर खर्च केला जातो.
‘अर्जुन ०७’ हा घोडा बैल मैदान, तीन फेरा मैदान, बिनजोड मैदान, सेकंद घाट अशा अनेक ठिकाणी मैदान गाजून मालकाचे नाव रोशन करतो. त्याची विशेषता म्हणजे जोड न लागल्याने अकरा वेळा बिनजोड विजयी झाल्याचे मालक प्रमोद घोटेकर यांनी सांगितले. पब्लिक किंग म्हणून ओळख असून अर्जुन हा चारही खांदी पळतो. दोन दिवसाआड नियमित सराव व पाण्यात पोहण्याने अर्जुन खूप चपळ बनला आहे. सकाळी डाळ शेंगदाणा पेंड, संध्याकाळी गहू पीठ, तेल गूळ दिले जाते. घरी शांत, मैदानात रागीट असलेला अर्जुन चार लाखाचा मनसबदार बनला आहे. प्रमोद घोटेकर, अभिजित राजगुरू, मंगेश गुंजाळ, अमोल घोटेकर, ज्ञानेश्वर परजणे, हर्षल कुटे, श्रीहरी मढवई हे त्याची विशेष काळजी घेतात.
----
कोट
शेतकरी आणि बैलाचे अतूट असं नाते असते. बळीराजा आपल्या खळ्यावरील बैलांची जिवापाड काळजी घेतात. यांत्रिकीकरणाच्या युगात शेतातील अनेक कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने होत असल्याने आम्ही बैलगाडा शर्यतीसाठी हौशीने बैल सांभाळतो आमचा ‘अर्जुन ०७’ याच्या वर महिन्याला दहा ते बारा हजार रुपये खर्च होतात.
- प्रमोद घोटेकर, शेतकरी, चिचोंडी, ता. येवला
--------------------