ब्राह्मणशेवगे शिवारातील
शेतकरी विजेच्या समस्येने त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
चाळीसगाव, ता. ६ ः ब्राह्मणशेवगे (ता. चाळीसगाव) शिवारातील गेल्या महिन्यापासून सातत्याने विजेचा लपंडाव सुरु आहे. १ सप्टेंबरपासून वीज वितरण कंपनीने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, सकाळी ५ ते दुपारी १२ पर्यंत वीजपुरवठा राहील असे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात एकही दिवस वीज पुरवठा सुरळीत नसतो. दिवसातून केवळ चारच तास वीज पुरवठा होत असल्याने व अधूनमधून वीज ये जा करीत असल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत.
एकीकडे वरुणराजाने दडी मारुन जवळपास महिना उलटला आहे. पिकांना पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. दुसरीकडे विजेचा लपंडाव शेतकऱ्यांच्या मुळाशी उठला आहे. पाऊस गायब झाल्याने पिके करपून सुकत आहेत. शेत शिवारातील बहुतांश ट्रान्सफार्मरवर ‘डिओ’सह कटाऊट धोकेदायक झाले आहेत. प्रत्येक ठिकाणी फ्यूज अथवा ‘डिओ’ गेल्यावर वीज कर्मचारी येतच नाहीत. त्यामुळे नाइलाजास्तव हे धोकेदायक काम शेतकऱ्यांना करावे लागते. फ्यूज व ‘डिओ’ टाकताना अथवा काढताना कोणतेही सुरक्षा साधने नसतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका असतो. ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे सांगितले तर संबंधित वीज कर्मचारी, अधिकारी सहकार्य करण्याऐवजी उलट उद्धटपणे बोलतात. त्यामुळे सर्व बाजूने शेतकरी नाडला जात आहे. वीज वितरण कंपनीने दखल घेऊन शासनाने जाहीर केलेल्या कालावधीनुसार तरी सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या संदर्भात गांभीर्याने दखल न घेतल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलनाचा मार्ग पत्करु, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
---------------------------