KPD26B12594
कापडणे : समाधान शिबिरात मार्गदर्शन करताना मनोहर भदाणे. शेजारी प्रांताधिकारी रोहन कुवर, तहसीलदार अरुण शेवाळे आदी.
---
समाधान शिबिरांना ग्रामस्थांचा प्रतिसाद
शासकीय योजनांचा लाभ थेट गावपातळीवर; नागरिकांत समाधान
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. १५ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित समाधान शिबिरांना ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, हजारो गरजू नागरिकांच्या समस्या गावपातळीवरच मार्गी लागल्याने शासकीय कार्यालयांचे हेलपाटे वाचले आहेत. या शिबिरांमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, हीच या उपक्रमाची मोठी यशस्वीता असल्याचे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे यांनी सांगितले.
कापडणे येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते. या वेळी जिल्हा मुद्रांक अधिकारी अनिल पुरे, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, तहसीलदार अरुण शेवाळे, नायब तहसीलदार देवेंद्र येवले, भाजप जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांच्यासह विविध गावांचे सरपंच, ग्राम अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून शासकीय योजना, दाखले, सातबारा उतारे, रेशनकार्ड दुरुस्ती, संजय गांधी योजना आदींसह नागरिकांचे विविध प्रश्न एकाच छताखाली मार्गी लावण्यात आले. दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
उपविभागीय अधिकारी रोहन कुवर यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देत नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. सदाशिव सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. मंडळाधिकारी कल्याणी पाटील यांनी आभार मानले.