अँकर
--
फोटो ः 12808
जळगाव : फॉरेन्सिक बॉटनी अँड एग्रीकल्चर पुस्तकाचे प्रकाशन करताना कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे आदी.
---
फॉरेन्सिक बॉटनी अँड एग्रीकल्चरमुळे गुन्ह्याचा उलगडा
प्रा.डाॅ. ढाले : कुलगुरु प्रा.डाॅ. माहेश्वरींच्या हस्ते पुस्तक प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. २३ : गुन्ह्यांच्या तपासात आता डीएनए आणि फिंगरप्रिंट्सप्रमाणेच झाडांची पाने, बिया, परागकण, लाकूड, साल किंवा वनस्पतीजन्य विषारी द्रव्येही अत्यंत महत्त्वाचे पुरावे ठरणार आहेत असे प्रतिपादन प्रा. डॉ. दत्ता ढाले यांनी केले.
‘फॉरेन्सिक बॉटनी अँड एग्रीकल्चर’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी आणि प्र-कुलगुरू प्रा. डॉ. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते झाले. पुस्तक धुळे येथील कर्मवीर डॉ. पा.रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. दत्ता ढाले आणि लक्ष्मी कृष्णन (कोची) यांनी संयुक्तपणे लिहिले आहे. या प्रकाशन सोहळ्यास प्रा. डॉ. प्रवीण महाले, डॉ. श्रीराम दाऊदखाने, डॉ. संजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. दत्ता ढाले म्हणाले की, या पुस्तकात कीटकनाशके, तणनाशके, अन्नविषबाधा, विषारी वनस्पती, नैसर्गिक विषद्रव्ये आणि त्यांचे मानवी आरोग्यावरील धोके यांची अतिशय शास्त्रीय व सोप्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. घटनास्थळावर आढळणारे परागकण, बिया किंवा लाकडाचे तुकडे यांवरून गुन्ह्याचा उलगडा कसा करावा, मृत्यूचा नेमका कालावधी कसा निश्चित करावा, तसेच विषप्रयोग व अमली पदार्थ प्रकरणांत वनस्पतीशास्त्राची नेमकी भूमिका काय असते, याचे सविस्तर विश्लेषण असल्याचे त्यांनी सांगितले.
एकूण दहा घटकांमध्ये विभागलेल्या या पुस्तकात फॉरेन्सिक बॉटनीची तत्त्वे, परागकणशास्त्र, कवकशास्त्र, कृषी रसायने, जैवदहशतवाद व त्यासंबंधित कायद्यांचा समावेश आहे. विद्यार्थी, संशोधक, पोलिस प्रशासन, न्यायवैद्यक तज्ज्ञ, कृषी अधिकारी आणि विधिज्ञांसाठी हा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल. दरम्यान, लेखकांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी आमदार कुणाल पाटील व प्राचार्य डॉ. मनोहर पाटील यांनी कौतुक केले आहे.
---