फोटो -15350
झोडगे : येथे बेकायदेशीर बांधलेले गाळे तोडताना प्रशासकीय कर्मचारी.
----
वादग्रस्त गाळ्यांवर अखेर चालला बुलडोझर
प्रशासनाला आली जाग; डॉ. पाटील यांचे उपोषण मागे
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. २६ : झोडगे येथील शासकीय जागेवर ग्रामपंचायतीने बेकायदेशीर बांधकाम करून बांधलेले गाळे न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रशासन तोडत नव्हते. या विरोधात डॉ. रवींद्र पाटील यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २२ जूनपासून उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत अखेर प्रशासनाने गुरुवारी (ता. २५) रात्री या अतिक्रमणित गाळ्यांवर बुलडोझर चालवून ते निष्कासित केले. तहसीलदार विशाल सोनवणे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर डॉ. पाटील यांनी चार दिवसांचे उपोषण मागे घेतले.
झोडगे येथे डॉ. पाटील यांच्या दवाखान्यासमोर ग्रामपंचायतीने तीन गाळे बांधले होते. त्या ठिकाणी वाचनालय व दवाखाना असल्याने रुग्ण आणि नागरिकांना मोठी अडचण होत होती. या गाळ्यासंदर्भात बारा वर्षांपासून शासन व न्यायालयीन लढा सुरू होता. न्यायालयाने डॉ. पाटील यांच्या बाजूने निकाल देऊनही अधिकारी कारवाई करण्यास धजावत नव्हते. अखेर उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रशासनाला जाग आली आणि रात्रीच अतिक्रमण हटवण्यात आले.
डॉ. पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, सह पोलिस अधीक्षक दर्शन दुग्गड, तहसीलदार विशाल सोनवणे, गट विकास अधिकारी भारत वंदे, सह पोलीस निरीक्षक पाटील उपस्थित होते. तसेच आम्ही मालेगावकरचे निखिल पवार, शेखर पगार, नारायण देसले, आर. डी. निकम, डॉ. टी. पी. देवरे, डॉ. शंकर पवार, अरुण शिंदे, राजेंद्र शिंदे, भूषण पाटील व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. पाटील यांनी प्रशासनाचे आभार मानले.
---