MSI26B08978
धुळे : येथील श्री.गुरू सेवा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा महिला वारकरी सेवारत्न पुरस्कार वसमार येथील हभप मालुबाई नेरकर यांना प्रदान करताना प्रणव गिरी महाराज.
-----------------
खानदेशातील वारकरी सेवेला सलाम
वसमारच्या मालूताई नेरकर यांना ‘महिला वारकरी सेवारत्न’ पुरस्काराने गौरव
सकाळ वृत्तसेवा
म्हसदी, ता. १३ : धुळे येथील श्री गुरु सेवा प्रतिष्ठानतर्फे खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील वारकरी बांधवांचा ‘वारकरी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये साक्री तालुक्यातील वसमार येथील ज्येष्ठ महिला वारकरी मालूताई शंकरराव नेरकर यांना एकमेव ‘महिला वारकरी सेवारत्न पुरस्कार’ प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व स्नेहवस्त्र असे होते. मालूताई नेरकर आणि संदीप नेरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नागाई संस्थानचे मठाधिपती महंत प्रणव गिरी महाराज, कीर्तनकार मच्छिंद्र जिभाऊ महाराज, शिक्षक श्री. माळी, अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास मोरे, श्री गुरु सेवा प्रतिष्ठानच्या विश्वस्तांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. वारकरी परंपरेचा प्रचार- प्रसार आणि जतन करण्यासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या वारकरी महानुभावांचा या वेळी गौरव करण्यात आला. पंढरपूर व त्र्यंबकेश्वर वारी, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, नित्य हरिपाठ, कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व जनजागृती करणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेला या पुरस्काराने मानाचा मुजरा करण्यात आला.
खानदेशातील चारही जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यातून विशिष्ट निकषांच्या आधारे चार ते पाच वारकरी बांधव आणि महिला वारकऱ्यांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये साक्री तालुक्यातील वसमार येथील हभप मालूताई शंकरराव नेरकर यांना एकमेव महिला वारकरी सेवारत्न पुरस्कार मिळाल्याने परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.