आदिवासी समाज विकासापासून वंचित
-------------------------------
लकी जाधव ः आदिवासी समाज मेळावा
सकाळ वृत्तसेवा
नामपूर ता. २४ : बागलाण तालुक्यातील आदिवासी बांधव अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधा पासून वंचित असल्याने समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांवर दबावगट निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रॉबिनहूड तंट्यामामा भिल संघर्ष समितीचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी केले.
येथील भाग्यविधाता मंगल कार्यालयात बुधवारी (ता. २४ ) आदिवासी समाजाच्या जनजागृती मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर नामपूर बाजार समितीचे माजी संचालक आंनदा मोरे, दीपक मोरे, सुनिल गायकवाड, सुहास गावित, पवन सोनवणे, सुनील गायकवाड, निर्मला वाघ, दिलीप बर्डे, आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला भगवान एकलव्य, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
जाधव म्हणाले की, देशाच्या इतिहासात आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. इंग्रजाना जेरीस आणणाऱ्या आदिवासी समाजाची आजही फारशी प्रगती झालेली नाही. समाजाला मुख्य प्रवाजात येण्यासाठी समाजातील मुलांनी शिकले पाहिजे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे म्हणाले की, समाजाने व्यसनाधिनता, मोबाईलचा अतिरेक, बालविवाह टाळावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याकामी नागरिकांनी सहकार्य करावे. तालुक्यातील पदाधिकारी प्रवीण पवार, साहेबराव अहिरे, अनिल सोनवणे, अनिल पवार, वैभव मोरे, दिपक गायकवाड, किशोर सोनवणे, संजय दळवी, गोविंद ठाकरे, प्रदीप मोरे, नंदू शिंदे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शांताराम गायकवाड यांनी केले. प्रवीण पवार यांनी आभार मानले
@चौकट
संघर्ष समितीच्या मागण्या
*आदिवासी मुलीचे बिगर आदिवासी सोबतचे विवाह रोखणे.
*समाजाला संघटित करून मुख्य प्रवाहात आणणे
*बोगस आदिवासी हटाव मोहीम राबवणे
*पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे
*धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करू नये.
नामपूर : येथील आदिवासी समाजाच्या मेळाव्यात बोलताना लकी जाधव