पान-२ मेन करणे
------------
कुंदेवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण करा
खासदार भगरे ः जिल्हाधिकारी, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
निफाड, ता.११ ः पिंपळगाव- निफाड रस्त्यावरील कुंदेवाडी रेल्वेस्थानकाजवळील गेट क्रमांक ९९ येथे मंजूर करण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. या स्थितीचा परिसरातील हजारो नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच वाहनधारकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. हे काम तातडीने पूर्ण करावे असे निर्देश खासदार भास्कर भगरे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
----------------
याप्रश्नी खासदार भगरे यांनी शुक्रवारी (ता.११) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घोडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
खासदार भगरे यांनी निफाडच्या बाजूने काम करण्यास कोणताही अडथळा नसल्याने त्या बाजूचे काम तातडीने गतीने सुरू करून पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्या. रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आवश्यक समन्वय साधून उर्वरित कामाला गती देण्याची मागणी केली.
१६-१
विस्थापितांचा प्रश्न मार्गी लावा
उड्डाणपुलाच्या कामासाठी कुंदेवाडी येथील काही घरकुले विस्थापित होणार आहेत. त्यामुळे संबंधित नागरिकांची तात्पुरती निवास व्यवस्था तातडीने करावी तसेच त्यांना पर्यायी जागेवर पक्की घरे उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणीही खासदार भगरे यांनी प्रशासनाकडे केली. विकासकामामुळे कोणत्याही नागरिकावर अन्याय होऊ नये आणि विस्थापित कुटुंबांना योग्य पुनर्वसन मिळावे, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
१६-१
पोहोच रस्त्यांचे काम अपूर्ण
मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळांवरील उड्डाणपुलाच्या गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूंचे पोहोच रस्ते, उर्वरित खांब आणि इतर आवश्यक कामे अद्याप अपूर्ण आहेत. रेल्वे आणि बांधकाम विभागाने परस्पर समन्वयाने कामाची अडचण तातडीने दूर करून युद्धपातळीवर काम पूर्ण करावे, असे खासदार भगरे यांनी सांगितले.
१६-१
वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न
पिंपळगाव हे मोठे कांदा बाजारपेठ केंद्र असल्याने या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. रेल्वे गाड्यांच्या ये-जा करण्याच्या वेळी गेट क्रमांक ९९ वारंवार २० ते ३० मिनिटे बंद राहते. त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. याचा सर्वाधिक त्रास कांदा वाहतूक करणारे शेतकरी, शाळकरी विद्यार्थी, प्रवासी आणि रुग्णवाहिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणे ही सर्वसामान्यांच्या दैनंदिन वाहतुकीशी आणि सुरक्षिततेशी संबंधित अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
------------