(उष्णतेशी संबंधित क्लिपआर्ट वापरावे)
---
सेकंड मेन
जिल्ह्यात उष्णतेची लाट; रात्रीच्या झळाही असह्य
(उपशीर्षक)
पारा ४५ अंशांवर कायम; आणखी चार दिवस उकाडा कायम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : जिल्ह्यात तापमानाचा पारा गेल्या चार दिवसांपासून ४५ अंशांच्या वर गेला असून, उन्हाची तीव्रता कायम आहे. जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून, उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यात सध्या कडक उन्हाचे चटके जाणवत आहेत. सकाळपासूनच अगदी भाजून काढणारे ऊन पडत असून, वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. तीन दिवसांपासून तापमानाचा पारा ४५ अंशांवर राहिला आहे. यामुळे नागरिकांना उकाड्याचा मोठा तडाखा बसत आहे. बाहेर उन्हाचे चटके व सावलीत उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
उष्णतेची लाट कायम
जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पुढील काही दिवस तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. राज्यात पावसाची शक्यता वर्तविली असली तरी जिल्ह्यात मात्र पावसाची शक्यता कमीच आहे. यामुळे जळगावमध्ये तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअसदरम्यान कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर उष्ण वाऱ्यांमुळे सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत.
जोरदार वारे
मागील तीन दिवस अगदी सकाळपासूनच उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढलेली होती. दिवसाच्या तापमानाचा पारा ४५ अंशांच्या वर राहिलेला असून, रात्रीचे तापमान देखील ३५ अंशांवर राहत असल्याने असह्य होणाऱ्या उष्ण झळा जाणवत आहे. यामुळे रात्री पंखे व कुलरची देखील हवा लागत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आज (ता.१४) सकाळी काही ढगाळ वातावरण होते. सायंकाळी देखील ढगाळ वातवरण निर्माण झाले होते. शिवाय जोरदार वारे देखील वाहत होते.
इन्फो
बाहेर न पडण्याचे आवाहन
वाढणाऱ्या तापमानामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तसेच मजुरांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. प्रामुख्याने दुपारी १२ ते ४ दरम्यान अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरणे, तसेच तेलकट आहार टाळावा.