एआय चित्र वापरावे
---
ॲंकर
महिला व बाल सहाय्य कक्ष ठरतोय आधारवड
समुपदेशनातून १२४ प्रकरणे निकाली; कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : जिल्हा महिला व बालविकास विभागांतर्गत आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात २००९ पासून महिला व बाल सहाय्य कक्ष कार्यरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कक्ष महिलांसाठी आधारवड ठरत आहे. कौटुंबिक हिंसाचार, मानसिक छळ, शारीरिक अत्याचार, मुलांच्या ताब्याचे वाद, व्यसनाधीनतेमुळे होणारा त्रास आदी समस्यांवर समुपदेशनाच्या माध्यमातून मार्ग काढण्याचे काम या कक्षामार्फत केले जात आहे.
महिला व बाल सहाय्य कक्षाच्या माध्यमातून घरगुती किंवा कौटुंबिक वादांमध्ये अडकलेल्या स्त्री-पुरुषांना मार्गदर्शन व समुपदेशन सेवा दिली जाते. महिलांचे सक्षमीकरण हा मुख्य उद्देश ठेवून शारीरिक, मानसिक छळ, मारहाण, टोमणे मारणे, शिवीगाळ, घराबाहेर काढणे, मुलांचा ताबा न देणे, व्यसनाधीनतेमुळे होणारा त्रास अशा विविध प्रकरणांमध्ये मदत केली जाते.
कायद्यांविषयी जागृती
कक्षामार्फत समुपदेशनासोबतच वैद्यकीय सेवा, विधीविषयक मार्गदर्शन, कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण, पीडित महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न, पोलिसांची मदत, निवारागृहाची सुविधा तसेच महिला व बालकांशी संबंधित कायद्यांविषयी जनजागृती, असे विविध उपक्रम राबविले जातात. विविध शासकीय योजनांची माहितीही लाभार्थींना दिली जाते.
विविध ३१ कार्यक्रम
महिला व बाल सहाय्य कक्षाच्या जनजागृतीसाठी शाळा, महाविद्यालये तसेच ग्रामीण भागात कायदेविषयक जनजागृतीचे ३१ कार्यक्रम घेण्यात आले. सध्या १० प्रकरणांमध्ये समुपदेशन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
समुपदेशन कक्ष
कक्षात विद्या सुधाकर सोनार व भाग्यश्री संजय सोनवणे या समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे, तसेच आधार संस्थेच्या अध्यक्षा भारती पाटील, सचिव रेणु प्रसाद, प्रा. विजयकुमार वाघमारे आणि पोलिस प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाचे कामकाज सुरू आहे.
चौकट
वर्षभरात १८५ प्रकरणे दाखल
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत कक्षाकडे एकूण १८५ प्रकरणे दाखल झाली होती. त्यापैकी १२४ प्रकरणे समुपदेशनाच्या माध्यमातून निकाली काढण्यात आली. तर ४३ प्रकरणे पुढील कार्यवाहीसाठी न्यायालयात पाठविण्यात आली. याशिवाय बालविवाह रोखण्याचे कामही कक्षाने प्रभावीपणे केले असून, एका बालविवाह प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.