पान ३ ॲंकर
NSK26H19308
जळगाव : डॉ. आनंद नाडकर्णी व डॉ. प्रदीप जोशी दांपत्य. जळगावातील एका भेटीप्रसंगीचा क्षण.
-----
नावाप्रमाणेच ‘आनंद’.. अत्यंत नम्र, मित्रसंग्रह असलेला सखा
उपशीर्षक
डॉ. जोशींनी सांगितली नाडकर्णींची आठवण; त्यांचे जळगावशी नाते अतूट
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : विख्यात मनोविकार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी ठाण्यात निधन झाल्याची वार्ता कळाली. अनेक वर्षांपासून असलेला जवळचा मित्र गेला. त्याच्या नावाप्रमाणेच तो नेहमी आनंदी असायचा. सुस्वभावी, अत्यंत नम्र आणि मित्र जोडणारा सखा म्हणून त्याच्या स्मृती कायम स्मरणात राहतील. अशा भावना येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांनी व्यक्त केली.
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या जळगावातील वास्तव्य व आठवणींबद्दल डॉ. जोशी यांच्याशी संपर्क केला असता ते डॉ. नाडकर्णींबद्दल भरभरुन बोलले. आयुष्यात अनेकांशी मैत्री झाली, अनेक मित्र मिळाले.. पण आनंदसारखा दिलखुलास मित्र कुणी नव्हता. नावाप्रमाणे नेहमी आनंदी राहणारा, खळखळून हसणारा आणि सर्वांना आपलंसं करणारा तो होता. साहित्य, कविता, नाट्य अशा विविध विषयांमध्ये त्याला विशेष रस. स्केचेसही सुंदर बनवायचा. अध्यात्मातही त्याला विशेष ऋची होती. व.वा. वाचनालय, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, रोटरी क्लब अशा संस्थांच्या माध्यमातून आम्ही त्याचे अनेक कार्यक्रम जळगावात घेतले.. त्याच्या अभ्यासपूर्ण भाषण अन् वैविध्यपूर्ण व्याख्यानाने जळगावकरांनी अनेकदा मेजवानी दिलीय, अशा आठवणी डॉ. जोशींनी विशद केल्या.
-----
(चौकट)
‘क्षणोक्षणी’च्या प्रकाशनाआधी
कविता वाचून दाखवल्या
जळगावातील एका भेटीत आनंदने त्याच्या ‘क्षणोक्षणी’ या काव्यसंग्रहातील कविता आम्हाला वाचून दाखवल्या. विशेष म्हणजे तेव्हा त्या पुस्तकाचे प्रकाशनही व्हायचे होते.. आनंदचं प्राथमिक शिक्षण जळगावातच त्यावेळच्या आदर्श शाळेत (आताची सु.ग. देवकर) झालेय.. त्यांचे वडील मु.जे. महाविद्यालयात उपप्राचार्य होते.. अशी माहितीही डॉ. जोशींनी दिली.
------------