पंचवटीत भरवस्तीत ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा
बंदुकीचा धाक दाखवत सोन्याच्या दागिन्यांची लूट; महिलेसह दुकानमालकाला मारहाण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : पंचवटीतील हिरावाडी परिसरात शुक्रवारी (ता.१५) रात्री भरवस्तीत असलेल्या ज्वेलर्स दुकानावर सहा संशयितांनी सशस्त्र दरोडा टाकत दहशत निर्माण केली. बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने लुटले. प्रतिकार करणाऱ्या दुकानमालक व महिलेला पिस्तुलाच्या बटाने आणि धारदार शस्त्राने मारहाण करण्यात आली. ही घटना हिरावाडी रोडवरील महालक्ष्मी नगरजवळ असलेल्या ‘समृद्धी ज्वेलर्स’ येथे रात्री ९ ते ९.३० च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय पगारिया व नैना पगारिया यांचे ‘समृद्धी ज्वेलर्स’ हे दुकान असून रात्री दुकान बंद करण्याची तयारी सुरू असताना सहा तरुण ग्राहकाच्या बहाण्याने दुकानात शिरले. काही क्षणांतच त्यांनी पिस्तूल व धारदार शस्त्रे बाहेर काढत पगारिया कुटुंबीयांना ओलीस धरले.
दरोडेखोरांनी दुकानातील दागिने लुटण्याचा प्रयत्न सुरू करताच विजय पगारिया यांनी प्रतिकार केला. यामुळे संतापलेल्या संशयितांनी विजय पगारिया आणि नैना पगारिया यांच्यावर हल्ला चढविला. पिस्तुलाच्या बटाने तसेच धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या मारहाणीत नैना पगारिया यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समजते. जखमी अवस्थेतही पगारिया कुटुंबीयांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र दरोडेखोरांनी अंदाजे पाच ते दहा तोळे सोन्याचे दागिने लुटून पलायन केले.
लुटलेल्या ऐवजात सोन्याची पोत, दोन अंगठ्या आणि ब्रेसलेटचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे हिरावाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईच्या दिशेने आरोपी फरार
दरोड्यानंतर संशयित आरोपी मुंबई-आग्रा महामार्गाने इगतपुरीच्या दिशेने पसार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलिस आयुक्त किरणकुमार चव्हाण, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, निरीक्षक सुनील पवार आणि गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात
घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींचा माग काढण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. जखमी विजय व नैना पगारिया यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.