पान एक
-----------------
महापालिकेची २४ वर्षांनंतरची भरती अंतिम टप्प्यात
अभियंत्यांना प्रशासनाकडून तातडीने नियुक्ती पत्रे
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : महापालिकेतील अभियंता संवर्गातील ११४ पदे आणि अग्निशमन विभागातील फायरमन व वाहनचालकांच्या १८६ पदांसाठी टीसीएसमार्फत राबविलेली नोकरभरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. २४ वर्षांनंतर होणाऱ्या या भरतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नियुक्ती प्रक्रिया काही काळ थांबली होती. मात्र, आचारसंहिता उठताच आणि सिंहस्थाच्या कामांची घाई लक्षात घेऊन पात्र उमेदवारांना तातडीने नियुक्ती पत्रे देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या ५३ अभियंत्यांपैकी २०-२५ जणांना तातडीने नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत.
एकूण ३० पदांसाठी महापालिकेकडे १९ हजार ४९८ अर्ज प्राप्त झाले होते. २४ व २५ फेब्रुवारी रोजी नाशिकसह राज्यातील १३ शहरांमधील २९ केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. यासाठी १५ हजार ५८२ उमेदवार हजर होते, तर ३ हजार ९१४ उमेदवार अनुपस्थित राहिले.
परीक्षा कुठल्याही गैरप्रकाराशिवाय सुरळीत पार पडली. परीक्षेनंतर प्रश्नांवरील आक्षेपांसाठी उमेदवारांना मुदत देण्यात आली. या कालावधीत टीसीएसकडे ३५७ आक्षेप ऑनलाइन प्राप्त झाले. आक्षेप पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ११४ अभियंत्यांची निवड यादी मागील महिन्यात जाहीर करण्यात आली. अग्निशमन विभागातील १८६ फायरमन व वाहनचालकांची निवड प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे.
--------------------------
५३ अभियंते पात्र, उर्वरितांची छाननी सुरू
११४ पैकी ५३ उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाली असून ते पात्र ठरले आहेत. उर्वरित ६१ उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी सुरू असून काहींनी मुदतवाढ मागितली आहे. सिंहस्थाच्या कामांसाठी अभियंत्यांची तातडीची गरज असल्याने पात्र ठरलेल्या ५३ पैकी काहींना आचारसंहिता संपताच नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत.
----------
‘आचारसंहितेमुळे नियुक्ती प्रक्रिया थांबली होती. आता ती संपत असल्याने तातडीची बाब म्हणून पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत.
लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त, प्रशासन