22246
नाशिकः हकीम मर्चंट क्रिकेट चषक स्पर्धेत विजयी ठरलेला एनसीएचा संघ.
--
हकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेचे
एनसीए संघाला विजेतेपद
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ः जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत १९ वर्षांखालील वयोगटातील हकीम मर्चंट क्रिकेट चषक स्पर्धेत चुरशीचे सामने झाले. स्पर्धेत नाशिक क्रिकेट अकादमी (एनसीए) संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीच्या सामन्यात एनसीएने द्वारका क्रिकेट अकादमीवर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवत स्पर्धा जिंकली.
दोन दिवसीय कसोटी स्वरूपात झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या एनसीएने कौशिक सूर्यवंशी (१५५), कर्णधार ऋग्वेद जाधव नाबाद (१५४), तन्मय जगताप (९१), ज्ञानदीप गवळी (८९) धावांच्या बलाढ्य फलंदाजीच्या जोरावर पहिल्या डावात ४ बाद ५२२ धावांचा डोंगर रचला. उत्तरादाखल द्वारकाने १२१ धावा केल्या. कर्णधार अर्णव तांबटने सर्वाधिक ४३ धावा केल्या. एनसीएच्या लेग स्पिनर अभिषेक कुंभारने ५, देवाशिष गायकवाडने ३, ज्ञानदीप गवळीने २ गडी बाद करून ४०१ धावांची मोठी आघाडी घेतली. एनसीएने फॉलो-ऑन न देता सामना संपेपर्यंत दुसऱ्या डावात ४ बाद ६४ धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या आघाडीवर १९ वर्षांखालील वयोगटातील कै. शिवाजीराव कातकाडे स्मृति चषक पाठोपाठ हकीम मर्चंट क्रिकेट चषकाचे विजेतेपदही पटकावले.