NSK26H22235
जळगाव : यजुर्वेंद्र महाजन यांचा पुरस्कार देऊन सन्मान करताना अण्णा हजारे.
--------------
यजुर्वेंद्र महाजन पद्मभूषण अण्णा हजारे पुरस्कार
---------
सामाजिक सेवेचा गौरव; राळेगणसिद्धी परिवारातर्फे पुरस्काराने सन्मानित
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी आणि राळेगणसिद्धी परिवाराच्या वतीने सामाजिक सेवा गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यात यंदाच्या पद्मभूषण अण्णा हजारे सामाजिक सेवा पुरस्काराने जळगावचे यजुर्वेंद्र महाजन यांना सन्मानित करण्यात आले.
राळेगणसिद्धी येथे आयोजित सोहळ्याला देवगडचे महंत भास्करगिरी महाराज, पद्मश्री पोपटराव पवार उपस्थित होते. पद्मभूषण अण्णा हजारे यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांच्या रकमेतील निधीच्या व्याजातून हे पुरस्कार दिले जातात. देशातील दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना निवासी उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची व्यवस्था उभारणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांना पद्मभूषण अण्णा हजारे सामाजिक सेवा पुरस्कार अण्णा हजारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी दीपस्तंभ फाउंडेशनचे राजेंद्र पाटील, अमोल लंके, मिलिंद आवळगावकर, महेंद्र पाटील, दिव्यांग विद्यार्थी बापू भोसले आणि आश्लेषा आमटे हे देखील होते. श्री. महाजन यांनी पुरस्काराची दोन लाख रुपयांची रक्कम दीपस्तंभ मनोबल पुणेच्या उभारणीसाठी दिली आहे. तर हा पुरस्कार दीपस्तंभ फाउंडेशनच्या विस्तारासाठी सर्वांना मार्गदर्शन करणाऱ्या मधुकर कोतवाल, अजय साठे, डॉ. अलका मांडके, पुखराज पगारिया, एम. के. सत्या, सुधीर वरदे, दीपक शाह, सल्लागार समितीच्या सर्व सदस्यांना अर्पण केला आहे.