NSK26H22284 : किरण राक्षे (मृत)
----
दुचाकींची धडक; तीन ठार
---
पाळधीजवळ अपघात; लग्नकार्य आटोपून परतताना घडली घटना
सकाळ वृत्तसेवा
पाळधी (ता. धरणगाव), ता. २२ : पाळधी- सावदा रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर एकाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. अन्य एक गंभीर जखमी आहे. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पथराड (ता. धरणगाव) येथील लग्न सोहळा पद्मालय येथे होता. लग्न आटोपून किरण बाबूलाल राक्षे आणि बाबूलाल श्यामराव राक्षे दुचाकीने (एमएच १९, ४२१३) घराकडे परतत होते. ते सावदा रस्त्यावरून जात असताना, समोरून येणाऱ्या दुसऱ्या भरधाव दुचाकीशी (एमएच १९, बीएन ५१४५) त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता, की दोन्ही वाहनांवरील प्रत्येकी एक जागीच ठार झाला. यात किरण राक्षे (रा. पथराड, ता. धरणगाव) व प्रदीप उखा निकम (वय ४०, रा. निंभोरा, ता. सोयगाव) हे मृत झाले. तसेच, दुचाकीवर मागे बसलेले बाबूलाल राक्षे (पथराड) व चेतन पाटील (३५, वाडे गुढे, ता. भडगाव) गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान चेतन पाटील यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. पथराड, निंभोरा आणि वाडे गुढे परिसरावर शोककळा पसरली आहे.