धुळे ः टुडे १ साटी
--
फोटो क्रमांक ः 22283
धुळे : मनपा विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी आंदोलन करताना एमआयएमचे पदाधिकारी व नगरसेवक.
--
विरोधी पक्षनेतेप्रश्नी एमआयएमचा एल्गार
-
हक्काच्या पदासाठी महापालिकेसमोर नगरसेवकांचेही धरणे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २२ : येथील महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद एमआयएमला देण्याच्या मागणीसाठी पक्षातर्फे सोमवारी (ता. २२) नवीन महापालिका इमारतीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. कायद्यानुसार हे पद एमआयएमलाच मिळणे अपेक्षित असताना महापालिका प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप पक्षाने केला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला.
एमआयएमचे जिल्हाध्यक्ष इर्शाद जहागीरदार यांनी पक्षाची कायदेशीर भूमिका मांडली. ते म्हणाले, की महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ मधील कलम १९ नुसार विरोधी बाकांवरील ज्या पक्षाकडे सर्वाधिक संख्याबळ असते, त्याच पक्षाला विरोधी पक्षनेतेपदाचा कायदेशीर अधिकार आहे. महापालिकेत सत्ताधारी पक्षांतरानंतर एमआयएम हाच दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असल्याने, हे पद तातडीने एमआयएमला जाहीर करावे. विरोधी पक्षनेते नियुक्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी मागणीही करण्यात आली. संजय देवराम भोईर विरुद्ध महापौर, ठाणे (२०१२) या न्यायालयीन निकालाचा दाखला देत, दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या पक्षाचा हा कायदेशीर हक्क न्यायालयानेही मान्य केला असल्याचे जहागीरदार यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नियमानुसार सहा महिन्यांच्या आत विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करणे बंधनकारक असते; मात्र धुळे महापालिकेत हे पद अजूनही रिक्त ठेवण्यात आले आहे. आवश्यक संख्याबळ नसतानाही अवैध मार्गाने हे पद हिरावून घेण्याचा राजकीय प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही पक्षाने केला. प्रशासनाने यावर तातडीने न्याय्य निर्णय न घेतल्यास मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनात नगरसेवक अन्सारी अब्दुल लतीफ अब्दुल हमीद, मन्सुरी मुख्तार कासीम, हसीन बानो साजिद अली, शेख शाहजहान बी, मिर्झा शोएब नवाब बेग, अन्सारी अमिरा बानो, अन्सारी हलिमा बानो, युसूफ ए. हमीद, पिंजारी मदिनाबी, पठाण आमीर अस्लम, अन्सारी जावेद, सौद सरदार आदी सहभागी झाले.
-