सोशल मीडियाचे चित्र वापरता येईल
--
समाज माध्यमांचा हवा जबाबदारीने वापर हवा
(उपशीर्षक)
प्राचार्य डॉ. नारखेडे : एकदिवसीय कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २५ : आजच्या डिजिटल युगात सामाजिक माध्यमांचा (सोशल मीडिया) सुयोग्य व जबाबदारीने वापर करणे महत्त्वाचे आहे. समाजप्रबोधन, जनजागृती आणि सकारात्मक विचारांच्या प्रसारासाठी समाज माध्यम हे प्रभावी माध्यम असल्याचे बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे यांनी सांगितले.
अजिंठा फिल्म सोसायटी, बालरंगभूमी परिषद (जळगाव), रिफ्लेक्शन फाउंडेशन संचलित पालक शाळा आणि डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सोशल मीडिया सुयोग्य वापर’ एकदिवसीय कार्यशाळा बेंडाळे महाविद्यालयात झाली. डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा सकारात्मक आणि जबाबदारीने वापर कसा करावा, याचे महत्त्वपूर्ण धडे या कार्यशाळेत देण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक सोशल मीडिया अभ्यासक तथा बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य नारखेडे यांनी भविष्यात बेंडाळे महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठीही स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. तर सोहळ्याचे औचित्य साधून अजिंठा फिल्म सोसायटी आणि बेंडाळे महाविद्यालय यांच्यात शैक्षणिक व सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी फिल्म सोसायटीचे उपाध्यक्ष अनिल भोळे, डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. श्रद्धा शुक्ल, पीयूष रावळ, चित्रसाधना सहसंयोजक डॉ. सुचित्रा लोंढे, ॲड. अनघा गोडबोले, पार्थ ठाकर, विभाग संयोजक प्रा. कमलाकर रुगे, संतोष सोनवणे, प्रा. पुरुषोत्तम महाजन आदी उपस्थित होते.
चौकट
एआय आधारित कंटेंट निर्मितीवर प्रकाश
मार्गदर्शनाच्या सत्रात योगेश शुक्ल यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सोशल मीडियाचा परस्परसंबंध सविस्तर उलगडून दाखवला. आतापर्यंत एआय क्षेत्रात बहुतांश काम इंग्रजीत झाले असून मराठी भाषेतील सामग्री अजूनही कमी आहे, ती वाढवणे गरजेचे आहे. त्यांनी विविध एआय आधारित ॲप्स आणि कंटेंट निर्मितीच्या आधुनिक साधनांची माहिती दिली.
––––