ओढा रेल्वे स्थानकाला आता थेट महापालिकेचे पाणी
सिंहस्थाच्या तयारीला गती; ट्रक टर्मिनसच्या जलकुंभातून नवीन वाहिनी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : सिंहस्थ २०२७ मध्ये ओढा रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या भाविकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही. कारण यासाठी नाशिक महापालिकेने यासाठी थेट पाणीपुरवठ्याची व्यवस्था आखली असून, आडगाव ट्रक टर्मिनसच्या जलकुंभातून ओढा रेल्वे स्थानकापर्यंत नवीन जलवाहिनी टाकली जाणार आहे.
सध्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने महापालिकेकडे परवानगी मागितली असून, त्यानुसार हा प्रस्ताव महासभेसमोर मंजुरीसाठी गेला आहे. मंजुरी मिळताच आडगाव परिसरात ५० हजार लिटरचा नवा आरसी सम्प उभारला जाईल आणि त्यावर पंपिंग यंत्रणा बसवून सुमारे ७.८७ किमी लांबीची जलवाहिनी ओढा स्थानकापर्यंत टाकली जाईल. यातून दररोज १० लाख लिटर पाणीपुरवठा होणार आहे.
विशेष म्हणजे, हा पाणीपुरवठा सिंहस्थासाठी पाटबंधारे विभागाने मंजूर केलेल्या अतिरिक्त पाण्यातूनच केला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या नेहमीच्या पाणीपुरवठ्यावर ताण येणार नाही. महापालिकेने मात्र काही अटी ठेवल्या आहेत. संपूर्ण बांधकामाचा खर्च ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला करावा लागेल. तसेच सिंहस्थ संपल्यानंतर हे संपूर्ण बांधकाम महापालिकेकडे हस्तांतरित करावे लागेल. सिंहस्थ संपल्यावर ही सुविधा बंद होईल आणि पुढे महापालिकेमार्फत पाणीपुरवठा केला जाणार नाही. महापालिका अधिकाऱ्यांच्या मते, ज्या जागेत हा सम्प उभारला जाणार आहे ती जागा सध्या ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित असून पीपीपी तत्त्वावर विकासाच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे कामासाठी आवश्यक तेवढीच जागा दिली जाणार आहे.महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करूनच हा आराखडा तयार केला आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधा उभारणीला गती देण्याचा हा प्रयत्न आहे.