धुळे टुडे ३ साठी मेन...
---
फोटो- NSK26H22350, NSK26H22351, NSK26H22352
धुळे ः शहरातील पारोळा रोड, शिवाजी नगर, मुल्ला नगर भागातील नाल्यांची सद्यस्थिती. (छायाचित्रे ः गोरख गर्दे)
---
पावसाची हजेरी तरी नाले तुंबलेलेच
---
जून संपण्याच्या मार्गावर तरीही मनपाचे काम संथगतीने; १०० टक्के कामावर प्रश्नचिन्ह
---
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २३ ः यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी असल्याचा अंदाज आहे. तसे संकेतही दिसत आहेत. अख्खा जून कोरडाठाक जाणार की काय अशी स्थिती असताना गेल्या दोन दिवसांपासून धुळ्यात मॉन्सूनच्या पावसाने नावाला हजेरी लावली. दरम्यान, यंदा पाऊस उशिरा व कमी असला तरी महापालिकेच्या माध्यमातून होणारी पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई मात्र अद्यापही अपूर्णावस्थेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहराच्या विविध भागातील नाले अद्यापही कचऱ्याने तुंबलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे ही नालेसफाई कधी पूर्ण होणार की, होणारच नाही याबाबत साशंकता आहे.
पावसाळ्यात नाले तुंबून कॉलनी, वस्त्यांमध्ये पाणी शिरु नये, पूरस्थिती निर्माण होऊन जीवित व वित्त हानी होवू नये यासाठी दरवर्षी महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नालेसफाई केली जाते. यंदाही तब्बल अडीच कोटी रुपयांची निविदा काढून काम सुरु करण्यात आले. यापूर्वी ५०-५५ लाखांत नालेसफाईचे काम करण्यात आले. यावर्षी मात्र नाल्यांमधील गाळ तेथेच पडू न देता तो उचलण्यात येणार असल्याचे सांगत अडीच कोटींची निविदा काढण्यात आली. कामही सुरु करण्यात आली. काही भागातील नालेसफाई करण्यात आली. मात्र, या कामावरही विरोधी पक्ष विशेषतः शिवसेना (उबाठा) पक्षाकडून थातुरमातूर काम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवाय पक्षाने या नालेसफाईच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार असल्याचा गंभीर आरोप करत चौकशीची मागणीही थेट नगरविकास राज्यमंत्र्यांसह सचिवांकडे करण्यात आली आहे. एकीकडे असे आरोप-प्रत्यारोप होत असताना दुसरीकडे नालेसफाईची स्थितीही प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे.
--
काही नाले कचऱ्याने तुुडुंब
शहरातील शिवाजी नगर, शंभर फुटी रोडवरील मुल्ला नगर, पारोळा रोड यासह इतर विविध भागातील काही नाले अद्यापही कचरा, गाळाने तुडुंब असल्याचे चित्र आहे. काही भागातील नाल्यांमध्ये गवत, झाडे-झुडपेही अद्याप जैसे थे आहेत. त्यामुळे या नाल्यांमध्ये महापालिकेचा जेसीबी अद्याप फिरकलेलादेखील नाही अशी स्थिती दिसते. काही ठिकाणी प्लॅस्टिक कचऱ्याने नाले तुडुंब आहेत. हे नाले कधी साफ होणार असा प्रश्न आहे. आता तर पावसानेही हजेरी लावली असून कमी-अधिक पाऊस झाला तर या नाल्यांमधून पावसाच्या पाण्याचा निचरा होणार का असा प्रश्न आहे.
---