जेईई-नीट प्रशिक्षणासाठी
१२ जुलैला चाळणी परीक्षा
नाशिक, ता. २३ : अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, विभागातर्फे जेईई-नीट चाळणी परीक्षेचे आदिवासी विकास विभागातर्फे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा १२ जुलैला सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत राज्यभरातील निवडक केंद्रांवर पार पडणार आहे. परीक्षेसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांना २ जुलैपर्यंत अर्ज (नावनोंदणी) करता येणार आहे.
भारतातील शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या ‘फिजिक्सवाला’च्या माध्यमातून राज्यातील अकरावीतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची जेईई-नीट परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना प्रामुख्याने फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स या विषयांचे धडे देण्यात येत आहेत. त्यासाठी बोपेगाव (ता. दिंडोरी, जि. नाशिक), पिसे (ता. भिवंडी, जि. ठाणे), शिरड शहापूर (ता. औंढा, जि. हिंगोली), सिंधीविहीर (ता. कारंजा, जि. वर्धा) ही चार केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यात गडचिरोली (ता. जि. गडचिरोली) या पाचव्या केंद्राची भर पडली आहे. दरम्यान, बोपेगाव, पिसे, शिरड शहापूर, सिंधीविहीर या केंद्रांमधील रिक्त, तर नव्याने मंजूर झालेल्या गडचिरोली केंद्रासाठी चाळणी परीक्षा होणार आहे.