युद्ध संपले; केरोसीन मात्र अद्याप ‘वाटेतच’!
तीन महिन्यांनंतरही सात तालुक्यांत पुरवठा नाही; जिल्हा पुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पर्यायी इंधन म्हणून नाशिक जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिलेले केरोसीन तब्बल तीन महिन्यांनंतरही अर्ध्याहून अधिक भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. युद्धजन्य परिस्थितीत तातडीने वितरित करण्याचे निर्देश असतानाही जिल्हा पुरवठा विभागाच्या नियोजनाअभावी अनेक तालुक्यांमध्ये केरोसीनचे वितरण रखडल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मध्य-पूर्वेतील तणावामुळे इराणमधून भारताकडे होणाऱ्या एलपीजी तसेच पेट्रोल-डिझेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मार्च ते मे या तीन महिन्यांसाठी एकत्रित केरोसीनचा कोटा उपलब्ध करून देत रेशनकार्डधारकांना प्राधान्याने वितरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यासाठी सुमारे २ लाख २८ हजार लिटर केरोसीन मंजूर करण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष वितरण प्रक्रियेत आलेल्या अडचणींमुळे मोठ्या प्रमाणावर केरोसीन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलेले नाही. दरम्यान, गेल्या आठवड्यात इराण आणि अमेरिकेने युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर कच्चे तेल व गॅस पुरवठा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. असे असतानाही नाशिक जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये केरोसीनचे वितरण पूर्ण होऊ न शकल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वितरण प्रक्रियेभोवती प्रश्नचिन्ह
सन २०२० पासून नाशिक जिल्हा ‘केरोसीनमुक्त’ घोषित झाल्याने पारंपरिक केरोसीन वितरकांच्या परवान्यांचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे यावेळी रेशन दुकानदारांच्या माध्यमातून केरोसीन वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अनेक रेशन दुकानदारांकडे आवश्यक वितरण साहित्य आणि व्यवस्था उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे.
पुरवठा विभागाच्या नोंदीनुसार काही तालुक्यांमध्ये केरोसीन पोहोचविण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात ते किती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वितरण प्रक्रियेची पारदर्शकता आणि अंमलबजावणी यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आठ तालुक्यांना ९६ हजार लिटर
जिल्हा पुरवठा विभागाने आतापर्यंत ९६ हजार लिटर केरोसीनचे वितरण केल्याचा दावा केला आहे. सिन्नर, नांदगाव, दिंडोरी, चांदवड, कळवण, पेठ, इगतपुरी आणि येवला या आठ तालुक्यांना प्रत्येकी १२ हजार लिटर केरोसीन देण्यात आले आहे. मात्र उर्वरित तालुक्यांतील लाभार्थी अजूनही प्रतीक्षेत असून, वितरण कधी पूर्ण होणार याबाबत अनिश्चितता कायम आहे.