फोटो : ६०४९५, २२३८३
शीर्षक :
मराठी सिनेमाने महाराष्ट्राबाहेर पाहिले पाहिजे
महेश मांजरेकर ः नाट्य परिषदेच्या पुरस्कार सोहळ्यात स्पष्ट मत
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : मराठी चित्रपटसृष्टीने केवळ हिंदी इंडस्ट्रीकडे पाहण्यापेक्षा महाराष्ट्राबाहेरील आणि जागतिक बाजारपेठेचा विचार करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त केले. ‘‘हिंदीत काम केले म्हणजे आपण मोठे झालो, हा फार छोटा विचार आहे. मराठी सिनेमाही सर्वत्र पोहोचला पाहिजे, यासाठी व्यापक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे,’’ असे ते म्हणाले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेतर्फे महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. १९९८ पासून दिल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांद्वारे मराठी रंगभूमी, नाट्यलेखन आणि नाट्यसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
मराठी चित्रपटसृष्टीच्या मर्यादित दृष्टिकोनाबाबत खंत व्यक्त करताना मांजरेकर म्हणाले, ‘‘कर्नाटक चित्रपटसृष्टीने जागतिक बाजारपेठेचा विचार केला आणि त्यांचा सिनेमा जगभर पोहोचला. आज ते शेकडो कोटी रुपयांच्या बजेटचे चित्रपट निर्माण करीत आहेत. आपण मात्र अजूनही त्या दिशेने विचार करीत नाही. मराठी चित्रपटसृष्टीनेही मोठे स्वप्न पाहिले पाहिजे.’’
या वेळी ज्येष्ठ नाटककार अभिराम भडकमकर यांना ‘वि. वा. शिरवाडकर नाट्यलेखन पुरस्कार’, महेश मांजरेकर यांना ‘प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार’, तर ज्येष्ठ रंगकर्मी सुनील देशपांडे यांना ‘नटश्रेष्ठ बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शिरवाडकर आणि कानेटकर पुरस्कारांचे स्वरूप सन्मानपत्र व ३१ हजार रुपये, तर बाबूराव सावंत पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र व १५ हजार रुपये असे होते.
बालरंगभूमी परिषद, मुंबईच्या अध्यक्षा नीलम शिर्के आणि अंजली कानेटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. प्रारंभी नटराज पूजन व नाट्य परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
पुरस्कार वितरणानंतर ज्येष्ठ पत्रकार शिबानी जोशी यांनी महेश मांजरेकर यांची प्रकट मुलाखत घेतली. या वेळी मांजरेकर यांनी नाट्य, चित्रपट आणि दिग्दर्शन क्षेत्रातील आपल्या प्रवासातील अनुभव, संघर्ष आणि यशोगाथा उलगडून सांगितल्या. शिबानी जोशी यांच्या नेमक्या प्रश्नांमुळे मुलाखत रंगतदार झाली आणि उपस्थित रसिकांनी तिला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
व्यासपीठावर प्रा. रवींद्र कदम, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, जयप्रकाश जातेगावकर, राजेश भुसारे यांच्यासह नाट्यप्रेमी, कलाकार, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मागील प्रवासाकडे पाहताना रंगली मुलाखत
पुरस्कार वितरणानंतर ज्येष्ठ पत्रकार शिबानी जोशी यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मांजरेकर यांनी आपल्या कलाप्रवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. ‘मला क्रिकेटपटू व्हायचे होते. नाटकात अपघाताने आलो; मात्र त्यातूनच आयुष्याची दिशा बदलली,’ असे सांगताना त्यांनी ‘एनएसडी’मधील अनुभव आणि नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, शबाना आझमी यांसारख्या दिग्गजांच्या सहवासातील आठवणी सांगितल्या.
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत, दिग्दर्शक जब्बार पटेल आणि महापौर हिमगौरी आडके यांची अनुपस्थिती उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरली. पावसामुळे कार्यक्रमाला अपेक्षित गर्दीही झाली नाही.