शहर टुडे पान चारसाठी
-------------------
साडेपाच लाख वृक्षलागवडीचे
जिल्ह्यात ग्रामपंचायतींना उद्दिष्ट
--------
आतापर्यंत दोन लाख खड्ड्यांचे खोदकाम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २५ : शासनाकडून दरवर्षी पावसाळा सुरू होताना वृक्षलागवडीची मोहीम राबविली जाते. त्यानुसार ग्रामपंचायतींना वृक्षलागवडीचे नियोजन केले जात असते. त्यानुसार यंदा जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पाच लाख ५९ हजार वृक्षलागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यासाठी सोमवारपासून वृक्षलागवडीला सुरवात झाली आहे.
जिल्ह्यातील एक हजार १६८ ग्रामपंचायती आहेत. या सर्व ग्रामपंचायतींना यंदाच्या मोसमात वृक्षलागवडीचे उद्दीष्ट दिले आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामीण भागात वृक्षलागवडीची मोहीम लवकरच सुरू केली जाणार आहे. मात्र, यंदा पावसाळा लांबल्याने या मोहिमेला सुरुवात करण्यासही विलंब झाला आहे. मात्र, वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्यास सुरवात करण्यात आली आहे.
वृक्षारोपणासाठी शासकीय नर्सरी व वनविभागाकडून झाडे मागविण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायतींच्या हद्दीत या महिन्यात वृक्षलागवडीची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत विभागाने नियोजन केले आहे. दमदार पावसाच्या हजेरीनंतर ग्रामपंचायतींना रोपे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे ग्रामपंचायत विभागाकडून सांगण्यात आले आहे.
वृक्षलागवड मोहिमेला जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून सुरवात झाली आहे. चांगला पाऊस झाल्यानंतर या मोहिमेला प्रत्यक्ष सुरवात केली जाणार आहे. सोमवारपासून खड्डे खोदण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. त्यानुसार दोन लाख खड्ड्यांचे खोदकाम झाले आहे. यात रावेर व चोपडा तालुके आघाडीवर आहेत.