NSK26H22463
कर्की (ता. मुक्ताईनगर) ः नाल्यावरून पाणी वाहिल्याने त्यात अडकलेली खासगी बस.
---
मुक्ताईनगर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस
---
भिंत पडून शेतमजुराचा मृत्यू ; नाल्याच्या पुरात बस अडकली
सकाळ वृत्तसेवा
मुक्ताईनगर, ता. २४ ः तालुक्यातील अंतुर्ली, कर्की परिसरात बुधवारी (ता. २४) झालेल्या पहिल्याच पावसाने रौद्ररूप धारण केले होते. या भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने परिसरातील नदी, नाल्यांना पूर आला होता. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले. कर्की येथील नाल्याला आलेल्या पुरात साखरपुड्याची बस अडकल्याची थरारक घटना घडली. सुदैवाने चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, आरटीओ बॅरेलजवळील भिंत कोसळल्याने शेतमजुराचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. सुनील रामराव पाटील (वय ४५, रा. भोटा) असे मृत शेतमजुराचे नाव आहे.
पहिल्याच मुसळधार पावसामुळे अंतुर्ली आणि कर्की परिसरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अन्नधान्य, कपडे आणि संसारोपयोगी वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले. मुख्य बाजारपेठेतील काही दुकानांमध्येही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. पावसाने पहिल्याच फटक्यात संपूर्ण परिसराला झोडपल्याने शेतकरी, व्यापारी आणि सामान्यांचे प्रचंड हाल झाले.
दुर्घटना टळली
कर्की (ता. मुक्ताईनगर) येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी पाहुण्यांना घेऊन आलेली खासगी बस गावाजवळील नाल्यावरून जात होती. त्याचवेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. पाहता पाहता नाल्यावरून पाणी वाहू लागल्याने बस पुराच्या पाण्यात अडकली. पाण्यात अडकल्याचे पाहून प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. प्रवाशांच्या जीवात जीव नव्हता. मात्र, बसचालकाने कमालीची तत्परता आणि धैर्याने परिस्थिती हाताळत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. बसमधील सर्व प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
भरपाईची मागणी
दरम्यान, पावसामुळे नुकसान झालेल्या भागात प्रशासनाने तत्काळ पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत. गोरगरिबांसह नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांनाही त्काळ शासकीय मदत द्यावी, अशी आग्रही मागणी अंतुर्ली व कर्की येथील ग्रामस्थांनी केली आहे.