संक्षिप्त
फुले मार्केटमधून
दुचाकी लांबविली
जळगाव : शहरातील मध्यवर्ती महात्मा फुले मार्केटच्या शौचालयाजवळून दुचाकी चोरीला गेली आहे. बांगडी विक्रेता शेख मोहम्मद अनिस शेख मेहबूब (वय ३०, रा. नशिराबाद) यांनी नेहमी प्रमाणे त्यांची दुचाकी गुरुवारी (ता.१८) सकाळी (एमएच १९, डीआर ८२२४) सार्वजनिक शौचालयाजवळ उभी केली होती. सायंकाळी घरी जाण्याच्या वेळी त्यांची दुचाकी जागेवर दिसून आली नाही. अखेर त्यांनी शहर पोलिसांत तक्रार दिल्यावरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक भगवान पाटील तपास करीत आहेत.
-------
घरात शिरून
कुटुंबाला मारहाण
जळगाव : धोबी वराड (ता. जळगाव) येथील शेतीकाम करणाऱ्या कुटुंबाच्या घरात घुसून सासू-सुनेसह चौघांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. शेजमजूर सोनू मधुकर जाधव (वय ३०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार धोबी वराड गावातील अरुण संतोष सोनवणे याच्याशी जुने वाद झाले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी अरुण याने दीपक वसंत सोनवणे, नितीन संतोष सोनवणे, यांच्यासह इतरांनी बुधवारी (ता.२४) सकाळी नऊच्या सुमारास लाठकाठ्या घेत जाधव यांच्या घरात प्रवेश केला. अरुण सोनवणे याने धारदार कुऱ्हाडीचा धाक दाखवत इतर चौघांनी उमा जाधव आई रत्नाबाई यांच्यासह चौघांना बेदम मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक किरण पाटील तपास करीत आहेत.
-----
वाहनाच्या धडकेत
कामगार गंभीर
जळगाव : जळगाव-अजिंठा रस्त्यावर दुचाकीने कामावर जाणाऱ्या कामगाराच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक देत गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (ता.२०) दुपारी घडली. जखमी सुधीर बन्सीलाल डहारा (वय ४८, रा.सिंधी कॉलनी, जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीखक राजेंद्र उगले तपास करीत आहेत.