पान-३ कॉमनसाठी
-------------
३६-२
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी
सध्या भरतीप्रक्रिया नाही
----------
बोगस पोस्टप्रकरणी गुन्हा दाखल
-----------------
नाशिक, ता. २५ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस व सुरक्षा विभागात कुंभमेळा भरती २०२६ अशी बोगस पोस्ट अज्ञाताने सोशल मीडियावर व्हायरल केली असून, यातून बेरोजगार युवकांची फसवणुकीची शक्यता आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, शहर आयुक्तालयातर्फे अशी कोणतीही भरतीची प्रक्रिया सुरू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शहर सायबर पोलिसांतील अंमलदार सुमीत काळे यांच्या फिर्यादीनुसार बुधवारी (ता. २४) ते कर्तव्यावर सायबर पेट्रोलिंग करीत होते. त्या वेळी सोशल मीडियावर ‘कुंभमेळा भरती २०२५ नाशिक पोलिस व सुरक्षा विभाग’ या नावाने संशयित पोस्ट व्हायरल झालेली त्यांना आढळली. यात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी फायरमन, सिक्युरिटी गार्ड, वाहतूक पोलिस आदी पदांची भरती केली जात असल्याचे म्हटले होते. इच्छुकांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. अर्जासोबत कागदपत्रांचीही यादीही दिली होती. निवड झालेल्या उमेदवारांना येत्या ४ जुलैपासून प्रशिक्षण सुरू होणार असल्याचे उल्लेख करीत ९३७०० ४९५७४ हा क्रमांकाही देण्यात आला आहे. ही व्हायरल पोस्ट बनावट असून, यातून बेरोजगार युवकांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने शहर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे अधिक तपास करीत आहेत.
----------------