आर्थिक बचतीसाठी मिठाई विक्रेत्यांकडून ग्राहकांच्या जिवाशी खेळ

आर्थिक बचतीसाठी मिठाई विक्रेत्यांकडून ग्राहकांच्या जिवाशी खेळ
Published on
लोगो : अन्नसुरक्षा वाऱ्यावर ----------------- मिठाईवर चमकते ती चांदीच नसते, घातक रंगांनाही जनता फसते! --------------------- ग्राहकांना भुरळ घालणाऱ्या गोड पदार्थांची ‘कडू’ कहाणी संजय वाघ : सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ : शहरातील मिठाई गल्ल्या या केवळ व्यापाराची केंद्रे नाहीत, तर शहराच्या खाद्यसंस्कृतीचे प्रतीक मानल्या जातात. सण- उत्सव, विवाहसोहळे आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये मिठाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, अनेक दुकानदारांकडून या गोड पदार्थांमागे आरोग्याला घातक ठरणारे कृत्रिम रंग, चांदीचा बनावट वर्ख आणि निकृष्ट दर्जाच्या कच्च्या मालाचा वापर करून ग्राहकांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. ‘एफडीए’ने कारवाईचा धडाका सुरू करताच विक्रेत्यांकडून ‘आम्ही नाही त्यातले’ असे दाखवीत साळसूदपणाचा आव आणला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात सातत्याने कारवाया केल्या जात असल्या, तरी बाजारात भेसळयुक्त मिठाईचा पुरवठा थांबलेला नाही. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मिठायांना अधिक चमकदार आणि आकर्षक रंग दिले जातात. विशेषतः पिवळ्या, केशरी आणि लाल रंगाच्या मिठायांमध्ये कृत्रिम रंगांचा वापर केला जात आहे. नैसर्गिक रंगांसाठी केसर, हळद किंवा इतर खाद्य घटकांचा वापर करावा लागतो. मात्र हे घटक तुलनेने महाग आहेत. मिठाई आकर्षक व खऱ्या गुलाबासारखी दिसावी यासाठी गुलाब रंग लिक्विड, पावडर किंवा जेल स्वरूपात वापरला जातो. ‘इरिथ्रोसिन’ किंवा ‘कार्मोसिन’ यांसारख्या खाण्यायोग्य रंगांचा वापर केला जातो. मिठाईमध्ये रंग आणि सुगंध एकत्र आणण्यासाठी अनेकदा सिरपचा वापर केला जातो. --- फूड कलर प्रामुख्याने मिठाई, केक, बेकिंग आणि आइस्क्रीममध्ये वापरले जातात. त्यात ऑरेंज रेड, लेमन यलो, केसरी, चॉकलेट ब्राऊन व ॲपल ग्रीन हे रंग उपलब्ध आहेत. या रंगांतील ५० ग्रॅमचा पुडा ६५ रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. शासनाने प्रमाणित केलेले रंग महागडे असूनही दुकानाचा दर्जा टिकविण्यासाठी त्यांचा वापर मेन रोड, जुन्या मिठाई गल्ल्या व सिडको आदी परिसरामध्ये केला जातो. हजारो किलो मिठाई तयार करणाऱ्या उत्पादकांसाठी ही बचत लाखो रुपयांपर्यंत पोहोचत असल्याने काही दुकानदारांकडून मेटॅनिल यलोसारखे अत्यंत स्वस्त व अल्प प्रमाणात तीव्र रंग देणाऱ्या औद्योगिक रंगांचा वापर केला जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. कॅन्सरपासून मज्जासंस्थेपर्यंत परिणाम मेटॅनिल यलो हा मानवी शरीरासाठी घातक मानला जातो. काही संशोधनांमध्ये त्याचा संबंध कॅन्सर, यकृताचे विकार आणि मज्जासंस्थेवरील दुष्परिणामांशी जोडला गेला आहे. लहान मुलांमध्ये अतिचंचलता, ॲलर्जी आणि पचनविकारांची शक्यताही नाकारता येत नाही. मिठायांवर लावला जाणारा चांदीचा वर्खही चिंतेचा विषय ठरत आहे. शुद्ध चांदीऐवजी ॲल्युमिनिअमचा वर्ख वापरला जात असल्याच्या तक्रारी अनेकदा पुढे आल्या आहेत. काही संशोधनांमध्ये शरीरातील ॲल्युमिनिअमचे अति प्रमाण आणि न्यूरोलॉजिकल आजारांतील संभाव्य संबंधावर चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वर्खाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वच्छता, दर्जाही महत्त्वाचा मिठाई तयार करताना वापरले जाणारे दूध, खवा, तूप, साखर आणि खाद्यतेल यांचा दर्जा अत्यंत महत्त्वाचा असतो. बऱ्याच ठिकाणी एफएसएसएआईच्या नियमांनुसार, मिठाईच्या बॉक्सवर शुद्ध खाद्य-दर्जाचा उल्लेख आढळून येत नाही. अनेक दुकानांमध्ये उत्पादन प्रक्रिया, साठवणूक, कर्मचाऱ्यांची स्वच्छता आणि तापमान नियंत्रणाबाबत नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येते. उघड्यावर ठेवलेली मिठाई, माश्यांचा वावर आणि अस्वच्छ परिसरामुळे अन्नजन्य आजारांचा धोका वाढतो. ‘एफडीए’कडून कारवाईचा धडाका सुरू होताच दुकानदारांकडून मिठाईची दुकाने तसेच माल बनविण्याच्या गुदामाच्या स्वच्छतेवर भर दिला जात असल्याचे चित्र शहरात दिसून आले. इन्फो... ग्राहकांनी काय काळजी घ्यावी? -अतिशय चमकदार रंगांच्या मिठाया टाळा. -परवानाधारक आणि स्वच्छ दुकानांतूनच खरेदी करा. -पॅकिंगवरील उत्पादन तारीख व घटक तपासा. -बिल घेण्याची सवय लावा. -संशयास्पद मिठाईबाबत एफडीएकडे तक्रार करा. --- कोट सद्यःस्‍थितीत रंगीबेरंगी मिठाईचे पदार्थ व चंदेरी रंगाचा वर्ख लावलेल्‍या मिठाईची बाजारपेठेत विक्री होत आहे. घातक प्रकारचे रंग व इतर वस्‍तूंद्वारे मिठाई सजविली जाते. या घटकांमुळे आरोग्‍यावर तातडीने काही परिणाम होत नसले तरी, दूरगामी गंभीर परिणाम होऊ शकतात. माव्‍यातील भेसळीचा धोका लक्षात घेता, नागरिकांनी जिलबी, पुरणपोळीसारखे पारंपरिक पदार्थ सेवन करताना संभाव्‍य धोका टाळावा. -डॉ. समीर चंद्रात्रे, फिजिशियन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com