फोटो घेणे
------------
निदा खानच्या जामिनावर
३० जूनला सुनावणी
लोगो
टीसीएस अत्याचार प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २५ : बहुराष्ट्रीय टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) कंपनीतील महिला अत्याचार व धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य संशयित निदा खान हिच्यासह तौसिफ अत्तार व दानिश शेख यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ३० जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. निदा खान ही गर्भवती असल्याने जामिनासाठी तिने नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.
देवळाली कॅम्प पोलिसांत या प्रकरणी संशयित निदा खानसह तौसिफ अत्तार व दानिश शेख यांच्याविरोधात अत्याचार व धर्मांतराच्या प्रयत्नासह ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान पसार झाली होती. तब्बल ४० दिवसांनी तिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. या प्रकरणी दोषारोपपत्रानंतर संशयितांनी पुन्हा न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली असता त्यावर दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आलेला आहे. त्यावर गुरुवारी (ता. २५) सुनावणी होती; परंतु ती येत्या ३० जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे निदा खानचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. दरम्यान, निदा खान गर्भवती असल्याने सहानुभूतीच्या अनुषंगाने तिने न्यायालयाकडे जामिनासाठी विनंती केली होती. त्याबाबत न्यायालयाने तिच्या वैद्यकीय अहवालाचे आदेश दिले होते. त्यानुसार हा अहवाल न्यायालयात सादर केल्याची शक्यता आहे.
------------------