धुळे : टुडे पान १ साठी..ॲंकर......(सुधारित ही बातमी घ्यावी)
--
धुळ्यात टीईटी परीक्षेवर यंत्रणेची ‘हाय-टेक’ नजर
--
जिल्ह्यातील २१ हजार उमेदवार परिक्षार्थी; जिल्हा प्रशासनाकडून तयारीही पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २५ : पुणेस्थित महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) जिल्ह्यात पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. यावर्षी जिल्ह्यातून २१ हजार २०८ उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये पेपर एकसाठी आठ हजार ९३४ उमेदवार, तर पेपर दोनसाठी १२ हजार २७४ उमेदवार असतील, अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. मनीष पवार यांनी दिली.
-
या परीक्षेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या अध्यक्षतेत परीक्षा आयोजन व सनियंत्रण समितीची बैठक पार पडली. दोन्ही अधिकाऱ्यांनी परीक्षेचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश दिले असून, परीक्षा काळात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
-
एआय सुरक्षेचा आधार
परीक्षा केंद्रात प्रवेश करताना प्रत्येक उमेदवाराची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जाईल. डमी उमेदवारांना आळा घालण्यासाठी ‘फेस रेकग्निशन’ व बायोमॅट्रिक हजेरी अनिवार्य असेल. याशिवाय सर्व परीक्षा दालने आणि मुख्य प्रवेशद्वारांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, याचे थेट नियंत्रण जिल्हा सनियंत्रण कक्ष व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. पवार यांच्याकडे असेल.
-
परीक्षार्थींसाठी सूचना
उमेदवारांच्या सुविधेसाठी दर ४८० उमेदवारांमागे एक परीक्षा केंद्र निश्चित केले असून, एका वर्गात २४ परीक्षार्थी असतील. परीक्षार्थींनी परीक्षेला येताना आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदान कार्ड यांपैकी एक मूळ फोटो ओळखपत्र व त्याची सत्यप्रत सोबत ठेवणे बंधनकारक आहे. परीक्षा केंद्रात मोबाईल, डिजिटल घड्याळ, कॅल्क्युलेटर, बुर्खा, मास्क किंवा टोपी यांसारख्या प्रतिबंधित वस्तू नेण्यास सक्त मनाई आहे.
-
१४-१
...चौकट...
१४-१
प्रवेशाबाबत वेळेचे बंधन लागू
पेपर एकसाठी सकाळी १० वाजून १० मिनिटानंतर आणि पेपर दोनसाठी दुपारी दोन वाजून दहा मिनिटानंतर कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, ज्या दिव्यांग परीक्षार्थींना लेखनिक घ्यावयाचा असेल त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची (प्राथमिक) पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. हा लेखनिक १२ वी पेक्षा जास्त शिकलेला नसून त्याचे वय २८ जूनला १९ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि तो कुटुंबातील सदस्य नसावा. सर्व उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून शांततेत परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व शिक्षणाधिकारी डॉ. पवार यांनी केले आहे.