मेन फिचर
NSK26H22574
जळगाव : बळीराम पेठेतील महापालिकेच्या शाळा क्रमांक २८ जवळ साचलेला कचरा.
---
बाजारपेठेत दिवसभर गजबज, रात्री कचराघर!
स्वच्छतेचे बदलते गणित; रात्रीची स्वतंत्र सफाई व्यवस्था उभारण्याची नागरिकांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २६ : शहरातील प्रमुख बाजारपेठा दिवसभर ग्राहकांच्या गर्दीने फुलून जातात; मात्र दुकाने बंद होताच त्याच रस्त्यांवर कचऱ्याचे साम्राज्य पसरत असल्याचे चित्र सातत्याने समोर येत आहे. दिवसभरातील व्यापार संपल्यानंतर उघड्यावर टाकला जाणारा भाजीपाल्याचा टाकाऊ माल, प्लॅस्टिक पिशव्या आणि इतर ओला कचरा रात्रभर रस्त्यावरच पडून राहत असल्याने शहराच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बळीराम पेठेतील भाजी बाजार, गांधी मार्केट, दाणा बाजार, फुले मार्केट, गोलाणी मार्केट, न्यू बी. जे. मार्केट, जुने बी. जे. मार्केट तसेच अन्य व्यापारी संकुल परिसरात ही समस्या अधिक तीव्र झाली आहे. याशिवाय विसजीनगर, आर. आर. शाळा परिसर आणि इतर व्यावसायिक रस्त्यांवरही अनेक व्यापाऱ्यांकडून थेट रस्त्यावर कचरा टाकला जात असल्याने सकाळ होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार होतात.
आरोग्याचा प्रश्न गंभीर
पावसाळ्यामुळे या समस्येची तीव्रता आणखी वाढली आहे. ओल्या कचऱ्यात साचणारे पाणी, कुजलेला भाजीपाला आणि प्लास्टिकमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून माशा, डास आणि भटक्या जनावरांचाही वावर वाढत आहे. परिणामी स्वच्छतेबरोबरच परिसरातील नागिकांचा तसेच काही शाळांच्या बाहेर कचरा साचलेल्या असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे.
रात्री हवी स्वच्छता मोहीम
याच पार्श्वभूमीवर बाजारपेठांसाठी स्वतंत्र ''रात्रीची स्वच्छता मोहीम'' राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. व्यापार बंद झाल्यानंतर तातडीने कचरा उचलला गेल्यास दुसऱ्या दिवशी बाजार स्वच्छ अवस्थेत सुरू होईल. याबाबत नूतन आयुक्त आदित्य जिवने यांनी देखील पाहणी केली असता ही समस्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाला स्वच्छतेचे नवीन वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहे.
चौकट
दुकानदारांना शिस्त लावणे आवश्यक
बाजारपेठ व व्यापारी संकुलांत दुकान धारक तसेच व्यावसायिक दररोज दैनंदिन निघणारा कचरा थेट रस्त्यावर टाकणे, दुकाना बाहेरच फेकणे किंवा व्यापारी संकुलातील कानाकोपऱ्यात फेकत आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालकीच्या सर्वच संकुलात अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. त्यामुळे कचरा टाकण्याची शिस्त महापालिका प्रशासनाने दुकानदारांना तसेच व्यवसायिकांना लावणे आवश्यक असल्याचे नागरिकांकाडून मत व्यक्त केले जात आहे.