लग्नाचा तारखा काढण्याची तयारी
तरुणाने घेतला टोकाचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२६ : गेल्या तीन आठवड्यापूर्वीच झालेला साखरपुडा आणि चार दिवसांवर वडिलांची सेवानिवृत्त सोहळ्याची घरात तयारी सुरू असताना तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपाविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.२६) दुपारी शहरात उघडकीस आली आहे. राजस संजय पाटील (वय २८, रा. धांडेनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
शहरातील धांडेनगर परिसरात काशीबाई उखाजी विद्यालय प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय पाटील परिवारासह वास्तव्यास आहे. त्यांचा मुलगा राजस याने शुक्रवारी दुपारी घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गळफास घेतला. दुपारी आई त्याला बोलविण्यासाठी गेल्यावर ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे आईला मोठा धक्का बसला. शेजारच्यांच्या मदतीने राजस यांस शासकीय रुग्णालय व महाविद्यालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासाअंती त्यास मृत घोषित केले. त्यानंतर कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला.
चौकट
महिनाभरापूर्वी झाला होता साखरपुडा
राजस याचा महिनाभरापूर्वी साखरपुडा झाला होता. त्याच्या लग्नाचा तारखा काढण्याची व इतर तयारी घरात सुरू होती. तसेच राजसचे वडील संजय पाटील हे ३० जूनला निवृत्त होणार असल्याने त्यानिमत्ताने करण्यास येणाऱ्या सेवापूर्ती सोहळ्याचे नियोजन घरात सुरू होते. घरात इतका उत्साह असताना राजसने एकदम टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या घटनेसंदर्भात रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.