जळगावातील ड्रग्ज पेडलरचा
अटकपूर्व जामीन फेटाळला
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.३१ : शहरात एमडी ड्रग्जची विक्री व पुरवठा केल्याप्रकरणी मुख्य संशयिताचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. देवेंद्र उर्फ भय्या दत्तात्रय सोनवणे असे या संशयिताचे नाव असून, त्याच्यावर संपूर्ण जिल्ह्यात ड्रग्जचा पुरवठा केल्याचा गंभीर आरोप आहे.
शहरातील मध्यवर्ती शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या जी.एच. मैदानावर जिल्हापेठ पोलिसांनी पाळत ठेवून केलेल्या कारवाईत जयेश देवीदास तायडे आणि हितेंद्र शिवाजी परदेशी अशा दोन ड्रग्ज पेडरला (५६.२९ ग्रॅम एम.डी.) ड्रग्जसह पकडले होते. मात्र, मुख्य पुरवठादार देवेंद्र उर्फ भय्या सोनवणे हा पोलिसांना पाहून दोन्ही संशयितांचे मोबाईल फोन हिसकावून घटनास्थळावरून पसार झाला होता.
अटकपूर्व फेटाळला
अटकेच्या भीतीने पळून गेलेला देवेंद्र उर्फ भय्या सोनवणे याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. जामिनाला विरोध करताना सरकारी पक्षातर्फे ॲड. रमाकांत सोनवणे यांनी जोरदार युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादनंतर, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
चौकट
तपासात धक्कादायक माहिती उघड
उपनिरीक्षक संतोष काशिनाथ पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी अटकेतील संशयित जयेश व हितेंद्र यांची चौकशी केली असता, जप्त एमडी ड्रग्ज त्यांना देवेंद्र उर्फ भय्या सोनवणे यानेच विकण्यासाठी पुरविले असल्याचे स्पष्ट झाले. तसेच तो संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री करीत असल्याचे तपासात समोर आले.