फोटो H28419
खंडणीखोर सद्दाम शेखला अखेर बेड्या
जागा बळकावून पाच कोटींच्या खंडणीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३१ : आडगाव शिवारातील कोट्यवधीची जमीन बळकावून संबंधित मालकाकडे पाच कोटींच्या खंडणीची मागणी केली. तसेच, मारहाण करीत एक लाख बळजबरीने हिसकावून घेतल्याप्रकरणी संशयित सद्दाम शेख, त्याची आई लता बर्डे आणि साथीदार राजाराम गटकळ या तिघांविरोधात आडगाव पोलिसांत खंडणीसह जागा बळकावणे, ठार करण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. संशयित सद्दामसह त्याच्या आईला पोलिसांनी अटक केली.
श्रीकांत कुलकर्णी (रा. कॉलेज रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची आडगाव शिवारातील समर्थनगर येथील रासबिहारी रोड, धात्रक फाटा येथे आठ हजार ६२५ चौरस मीटर जमीन आहे. या जागेला विकसित करण्यात येणार होते. दरम्यान, मार्च २०२५ मध्ये ते आपल्या मुलासह जागा पाहण्यासाठी गेले असता संशयित सद्दाम बाबू शेख, त्याची आई लता भिका बर्डे, राजाराम केशव गटकळ यांनी संगनमताने सदर जागेवर बेकायदेशीररीत्या कब्जा केला होता. संशयितांनी बनावट कागदपत्रे तयार केली होती. सदर जागेचा ताबा देण्याच्या मोबदल्यात संशयितांनी पाच कोटींच्या खंडणीची मागणी केली.
या वेळी संशयितांनी कुलकर्णी बापलेकांना बेदम मारहाण केली. खंडणी न दिल्यास ठार करण्याची धमकीही दिली. या वेळी संशयित सद्दाम याने कुलकर्णी यांना मारहाण करताना त्यांच्या मानेवर पाय देत त्यांच्या खिशातील एक लाखाची रोकड बळजबरीने हिसकावून घेतली. तसेच, खोट्या जातिवाचक शिवीगाळच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकीही दिली. संशयित दीड वर्षापासून कुलकर्णी यांना धमकावत असून, त्याने जागाही बळकावली आहे. अखेर कुलकर्णी यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयित सद्दाम याची आडगाव शिवारात कमालीची दहशत असून, त्याच्याविरोधात तक्रार देण्याचही कोणी धजावत नसल्याचे बोलले जाते. त्याच्या अटकेने अनेकांनी समाधान व्यक्त केले असून, त्याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी पोलिसाशी संपर्क साधण्याचे आवाहन आडगाव पोलिसांनी केले आहे.
सद्दामचे पोलिसांवर आरोप
दरम्यान, संशयित सद्दाम याने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करीत त्याद्वारे त्याने शहर पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिस मुद्दाम त्रास देत असल्याचे सांगत त्याने घरझडती घेतल्याचे व गुन्हे शाखेच्या कार्यालयात बसवून ठेवल्याचाही आरोप केला आहे.