टुडे एकसाठी
-----------
जिल्ह्यात अनेक दिवसांच्या
प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन
---
हलक्या सरींनी दिलासा; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १ : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला. जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने मंगळवारी (ता.१) सकाळी हजेरी लावली. त्यामुळे दीर्घ उघडीपमुळे खरीप पिकांवर पाण्याचा ताण जाणवू लागला असताना पावसाच्या आगमनाने शेतशिवाराला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यासह राज्यातदेखील पावसाची उघडीप होती. श्रावण महिना असतानाही सकाळपासूनच कडक ऊन व दुपारी वाढणारा उकाडा यामुळे नागरिकही हैराण झाले होते. मुख्य म्हणजे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका आदी पिकांसाठी पावसाची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागून होत्या. यातच मंगळवारी जिल्ह्यातील अनेक भागांत तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला.
शेतशिवाराला दिलासा
साधारण वीस-पंचवीस दिवसांच्या उघडीपमुळे जमिनीतील ओलावा कमी झाला होता. हलक्या जमिनीतील पिकांवर पाण्याचा ताण अधिक जाणवत होता. काही भागांत पिकांची पाने कोमेजू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. अशास्थितीत पावसाने हजेरी लावल्याने पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
दमदार पावसाची प्रतीक्षा
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, खरीप पिकांच्या पुढील वाढीसाठी सातत्यपूर्ण व समाधानकारक पावसाची आवश्यकता आहे. मंगळवारी सकाळी झालेला तुरळक स्वरूपाचा पाऊस पिकांसाठी पुरेसा नसून, जोरदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले.