आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा
हर्षवर्धन सपकाळ : युवकांच्या आंदोलनास काँग्रेसचा पाठिंबा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १ : दोन वर्षांत ५८४ आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करत, या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी केली. नाशिकमध्ये सकल आदिवासी समाजातर्फे आयोजित राज्यव्यापी ‘उलगुलान’ आंदोलनाला मंगळवारी (ता.१) भेट देऊन त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला व आंदोलनाला पाठिंबा दिला.
शासकीय नोकरभरतीतील बिंदूनामावलीत आदिवासी समाजाला आठव्या क्रमांकावर टाकण्यात आल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. बिंदूनामावलीतील त्रुटी तातडीने दूर करून आदिवासी समाजाला न्याय्य हक्क द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. प्रशासनातील भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावर लोकशाहीचे धडे देणे, अशी सरकारची कार्यपद्धती असल्याची टीकाही त्यांनी केली.
फडणवीसांवरही टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना सपकाळ म्हणाले, ‘खोटे बोला आणि रेटून बोला, हीच त्यांची कार्यपद्धती झाली आहे. त्यांना विसरण्याचा आजार जडला असून ते ‘गझनी’ झाले आहेत. त्यांना ‘गेट वेल सून’ असा सल्ला देतो.’
कुंभमेळ्याच्या खर्चावरून सरकारला लक्ष्य
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही कुंभमेळ्याच्या खर्चावरून सरकारवर टीका केली. राजीव गांधी आणि मनमोहनसिंग यांच्या काळात शिक्षणावर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३.७ टक्के खर्च होत होता. आता हा खर्च १.७ टक्क्यांवर आला आहे. शिक्षण व्यवस्था संपविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘काँग्रेसच्या काळातही कुंभमेळा आणि चारधाम यात्रा झाल्या. मात्र, त्यासाठी ५ ते १० हजार कोटी रुपये खर्च झाले असते. आता पाच कंत्राटदारांनी आत्महत्या केल्यानंतरही सरकार ३५ हजार कोटी रुपये खर्च करीत आहे. त्यातील १५ हजार कोटी रुपये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी खर्च केले असते, तर समाज सरकारच्या पाठीशी उभा राहिला असता,’ असे वडेट्टीवार म्हणाले.