फोटो - NSK26H28592
सौंदाणे: शिक्षक समितीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिभाऊ बच्छाव यांचा सत्कार करताना उद्योजक दादासाहेब सूर्यवंशी व मित्र परिवार
लेखक फोटो - राजेंद्र दिघे
धडाडीचे शिक्षक नेतृत्व : जिभाऊ (तात्या) बच्छाव
----------------------------------------
राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष जिभाऊ बच्छाव यांनी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देताना, संघटक म्हणून शिक्षकांच्या हक्कासाठी आवाज उठविताना आणि ‘तात्या’ म्हणून माणसांशी आपुलकीचे नाते जपताना जिभाऊ बच्छाव यांनी आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे.
- राजेंद्र दिघे, मालेगाव
मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथील यशोदा व भिवसन बच्छाव या शेतकरी आणि वारकरी संप्रदायातील संस्कारशील दांपत्याच्या कुटुंबात जिभाऊ बच्छाव यांचा जन्म झाला. कष्ट, प्रामाणिकपणा, साधेपणा आणि माणुसकीचे संस्कार त्यांना घरातूनच मिळाले. गावच्या परिसरात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी डी.एड. पदवी पूर्ण केली आणि १९ डिसेंबर १९९१ रोजी इगतपुरी तालुक्यातील आव्हाटे येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात झाली. या काळात जिल्ह्यातील अनेक शिक्षक मित्रांशी त्यांचा संपर्क आला. हा संपर्क पुढे त्यांच्या संघटनात्मक प्रवासाची भक्कम पायाभरणी ठरला. चार वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. त्याच काळात मैत्री, आपुलकी आणि संघटन कौशल्य ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये अधिक ठळक होत गेली. देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे त्यांनी सेवा बजावली. कसमादेच्या मातीशी असलेले त्यांचे ऋणानुबंध मात्र कायम राहिले. शिक्षक मित्रांचा वाढता गोतावळा, व्यापक संपर्क आणि शिक्षकांच्या प्रश्नांविषयीची संवेदनशीलता यामुळे ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या आजीव सदस्यत्वाच्या प्रवासातून जिल्हाध्यक्षपदापर्यंत पोहोचले. तीन दशकांच्या काळात मायभूमी असलेल्या तालुक्यातील विविध शाळांमध्ये त्यांनी शैक्षणिक कार्य गतिमान ठेवले. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असतानाच शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघटनात्मक पातळीवरही त्यांनी सक्रिय भूमिका घेतली.
▪️ नेत्यांच्या सहवासात जडणघडण
कै. देवाजी नाना आणि काळूजी बोरसे पाटील यांच्या मुशीत त्यांना संघटनात्मक जाणीव आणि कामकाजाचे धडे मिळाले. शिक्षक समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय झाला किंवा एखादा शिक्षक अडचणीत आला, तर त्याच्या मदतीला धावून जाणे ही त्यांच्या स्वभावाची ओळख बनली. त्यांच्या आपुलकीच्या स्वभावामुळे मित्रमंडळी त्यांना प्रेमाने ‘तात्या’ म्हणून संबोधतात.
▪️शिक्षकांच्या आर्थिक स्थैर्यासाठी पुढाकार
शिक्षकांच्या आर्थिक स्थैर्याचा विचार करून सौंदाणे गावातील शिक्षक मित्रांच्या पुढाकारातून शिक्षक पतसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संस्थेचे संस्थापक संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी दोन वेळा चेअरमनपदाची धुरा सांभाळली. शिक्षकांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी संस्थात्मक पातळीवर त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने कार्यरत राहिल्याचे फलित म्हणून त्यांच्यावर मोठ्या मालेगाव तालुक्याच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी तालुक्यातील शिक्षकांना संघटनेशी जोडत संघटनेच्या कार्याला व्यापक स्वरूप दिले आणि मालेगावचे संघटनात्मक प्रस्थ निर्माण केले.
▪️तालुक्यापासून जिल्ह्याच्या नेतृत्वापर्यंत
कामाच्या जोरावर पुढे त्यांना जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. या माध्यमातून जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे विविध प्रश्न, प्रलंबित मागण्या आणि अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. राज्य उपाध्यक्ष आनंदा कांदळकर यांच्या समवेत त्यांनी अनेक प्रश्नांवर धडाडीने भूमिका घेतली. आई-वडिलांचे संस्कार, गावातील शिक्षक मित्रांचा व्यापक संपर्क, शिक्षकांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ आणि संघटन वाढविण्याची हातोटी या सर्वांचा परिपाक म्हणून आज ते नाशिकच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत.
▪️आधी बालकांचे पालकत्व, शिक्षण मग संघटना
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनातून शैक्षणिक क्षेत्राची दिशा समजून घेत, ‘आधी बालकांचे पालकत्व, शिक्षण मग संघटना’ या भूमिकेतून जिभाऊ बच्छाव विविध आघाड्यांवर कार्यरत आहेत. त्यांच्या दृष्टीने संघटना ही केवळ शिक्षकांचे प्रश्न मांडण्याचे माध्यम नाही, तर शिक्षक, विद्यार्थी आणि समाज यांच्या व्यापक हितासाठी काम करण्याचे व्यासपीठ आहे. त्यामुळे विविध तालुक्यांतील शिक्षक पतसंस्था, शिक्षक संघटनांची वाढ, जिल्हा मेळावे, शिक्षक गौरव सोहळे आणि विविध सामाजिक-शैक्षणिक उपक्रमांमध्ये ते सक्रिय सहभाग नोंदवतात. संपर्क जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. राज्यभरातील शिक्षक मित्रांचा मोठा गोतावळा त्यांनी आपल्या कार्यातून निर्माण केला आहे. पदामुळे नव्हे, तर कामामुळे निर्माण झालेला विश्वास हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद आहे.