NSK26H28589 : मयूर ठाकरे
---
पेपरफुटी प्रकरणी मयूर ठाकरे
मुंबई पोलिसांच्या ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षकपदाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणी नंदुरबारातील मयूर ठाकरे यांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता. १) रात्री नाशिक येथून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली.
या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यंत नंदुरबारातील कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील, परिवर्धा शाळेचे मुख्याध्यापक अमृत पाटील, तक्रारदार तथा ‘एमपीएससी’चा परीक्षार्थी गौरव पाटील, ऋतुजा पाटील आणि नंदुरबारातील मूळ रहिवासी तथा ‘एमपीएससी’चे सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाल मराठे या पाच जणांना अटक केली. आता मयूर ठाकरे यांना पथकाने ताब्यात घेतल्याने संशयितांची संख्या सहा झाली आहे. मंगळवारी मुंबई गुन्हे शाखेचे पथक नंदुरबारात दाखल झाले होते. त्या वेळी पथकाने ऋतुजा पाटील हिला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच दिवशी रात्री पथकाने नाशिकमधून मयूर ठाकरे यांना ताब्यात घेतले. मयूर ठाकरे नंदुरबार शहरातील एका नामांकित संस्थेत क्रीडाशिक्षक आहेत. ठाकरे अटकेत असलेले अमृत पाटील यांचे नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. ठाकरे यांची क्रीडा क्षेत्रात आदर्श शिक्षक म्हणून ओळख असून, त्यांना राज्य शासनाने विविध पुरस्कारांनी गौरविले आहे. जिल्हा क्रीडा पुरस्कार, गुणवंत क्रीडाशिक्षक पुरस्कार आणि जिल्हा युवा पुरस्काराचे ते मानकरी आहेत. पेपरफुटी प्रकरणात मयूर ठाकरे यांनी मध्यस्थ म्हणून भूमिका पार पाडल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने मुंबई गुन्हे शाखेचे पथक कसून चौकशी करीत आहे.