आदिवासी युवकांच्या आंदोलनाला राहुल गांधींचे बळ
भूमिकेवर ठाम राहा; मंत्री अशोक उईके यांचा राजीनामा घेण्यासाठी भाग पाडू
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : आदिवासी वसतिगृहांतील असुविधांविरोधात एल्गार पुकारलेल्या ‘जेन झी’ आंदोलनकर्त्या युवकांशी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी (ता. २) थेट संवाद साधला. आंदोलनकर्त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहावे, त्यांच्या मागण्यांना काँग्रेसचे पाठबळ राहील, तसेच आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके यांचा राजीनामा घेण्यासाठी सरकारला भाग पाडू, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली.
संघटन सृजन शिबिरानिमित्त नाशिकमध्ये आलेल्या राहुल गांधी यांनी आदिवासी शाळा व वसतिगृहांतील असुविधांविरोधात आंदोलन करणाऱ्या युवकांची भेट घेतली. एमटीडीसी रिसॉर्टमध्ये झालेल्या या भेटीत राहुल गांधी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या वेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या प्रमुख मागण्या गांधी यांच्यासमोर मांडल्या.
सेंट्रल किचन पद्धत बंद करून विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर पोषण आहार उपलब्ध करून द्यावा, दोन वर्षांत वसतिगृहांतील ५९० विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.
यावर राहुल गांधी यांनी आंदोलनकर्त्यांना धीर देत, ‘‘तुमच्या भूमिकेवर ठाम राहा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पूर्ण बळ देऊ. मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठीही सरकारला भाग पाडू,’’ अशी भूमिका मांडल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
आदिवासी शाळांमधील असुविधांविरोधात ‘उलगुलान’ आंदोलनांतर्गत सुरू असलेले ‘जेन झी’ युवकांचे उपोषण अद्याप कायम आहे. राहुल गांधी यांनी आंदोलनकर्त्यांशी ‘वन टू वन’ संवाद साधत प्रत्येकाची भूमिका जाणून घेतली. ‘‘तुम्हाला नेमके काय हवे आहे, आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, हे निश्चित करा. मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत राहू,’’ असेही त्यांनी सांगितले.
राहुल पावरा, सागर पावरा, विवेक गावित, लक्ष्मी जाधव, प्रशांत गावंडे, अरुण पावरा, सचिन पावरा यांच्यासह छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार आणि पुणे येथील उपोषणकर्ते उपस्थित होते.
कोट
राहुल गांधी यांनी आमचे सर्व प्रश्न समजून घेतले आणि त्यावर उपाय काय असू शकतात, याविषयी मार्गदर्शन केले. आम्ही आदिवासी विकासमंत्र्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहोत. त्यादृष्टीने आम्ही पुढील रणनीती ठरवत आहोत.
- सागर पावरा, आंदोलक
चौकट
आदित्य ठाकरे आज भेटणार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे गुरुवारी (ता. ३) सकाळी पावणेअकराला ईदगाह मैदानावर सुरू असलेल्या आदिवासी उपोषणकर्ते व विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. काँग्रेसपाठोपाठ आता शिवसेनाही या आंदोलनात उतरल्याने आंदोलनकर्त्या युवकांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे.
घटनाक्रम
राहुल गांधींचे पाच तास
१०.४५ वा. : नाशिकमधील एमटीडीसी, ग्रेप रिसॉर्ट या ठिकाणी आगमन
१०.५० ते ११.३५ : जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांशी संवाद व फोटोसेशन
११.४५ ते १२.४५ : राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक
दु.१ ते ३.३० : जिल्हाध्यक्षांशी दोन सत्रांत संवाद व बैठक
३.३० ते ४ : आदिवासी युवकांशी चर्चा व संवाद
४.१५ वा. : विमानतळाकडे रवाना