बनावट धनादेशाद्वारे
इन्व्हर्टर, बॅटऱ्या लंपास
व्यापाऱ्याची ७२ हजारांत फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३ : बंद पडलेल्या बँक खात्याचा आणि बनावट स्वाक्षरीचा धनादेश देऊन एका व्यापाऱ्याची ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कुसुंबा (ता. जळगाव) येथील दुकानातून ३ इन्व्हर्टर आणि ३ बॅटऱ्या रिक्षामधून मागवून घेत ठगबाजाने व्यापाऱ्याला गंडा घातला आहे.
कुसुंबा (ता. जळगाव) येथील ‘श्रीनिवास एजन्सी’चे मालक पवन संजय पाटील (वय २८) यांना १२ जुलैला सकाळी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून इन्व्हर्टर व बॅटऱ्यांची मागणी केली. त्यानंतर या संशयिताने रिक्षा पाठवून रिक्षाचालकामार्फत ''बँक ऑफ बडोदा''चा ७२ हजारांचा धनादेश (क्रमांक ००००५९) पाठवला. पवन पाटील यांनी धनादेश स्वीकारून रिक्षात ३ मायक्रोटेक इन्व्हर्टर व ३ एक्साइड बॅटऱ्या पाठविल्या.
चौकट
स्वाक्षरी कुणाची, धनादेश कुणाचा?
त्यानंतर पवन पाटील यांनी हा धनादेश बँकेत जमा केला असता, धनादेशावरील स्वाक्षरी जुळत नसल्याचे आणि संबंधित बँक खाते आधीच बंद असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवन पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. फोन करून बॅटऱ्यांची मागणी करणाऱ्या मोबाईलधारक चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक गफ्फार तडवी तपास करीत आहेत.