‘जेन झी’ला घाबरणारे सरकार धार्मिक मुद्दे उठविणार
---
शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : पुण्यात ‘डीजे’ला विरोध केला म्हणून विद्यानंद बापटांवर हल्ला होतो. तसेच, रस्त्यावरील खड्डे आणि आमदारांच्या गाडीला नंबरप्लेट नसल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मध्यरात्री अटक होते. महाराष्ट्रात सध्या कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. ‘जेन झी’ला घाबरलेल्या या सरकारने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी धार्मिक मुद्दे आता उपस्थित करण्यास सुरुवात केल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली.
आमदार आदित्य ठाकरे गुरुवारी (ता. ३) नाशिक दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरे म्हणाले, की हल्ला झालेले विद्यानंद बापट हे कोणत्याही सण, उत्सवाच्या विरोधात नसून, त्यांनी केवळ डीजेच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. डीजे किंवा ध्वनिवर्धकाबाबत स्थानिक जनता, मंडळे आणि शहरांनी घेतलेला निर्णय सर्वमान्य असायला हवा, मात्र पोलिस केवळ ठराविक मतदारसंघांत आणि ठराविक लोकांवरच कारवाई करतात, असे सांगत पोलिसांचा दुटप्पीपणा त्यांनी या वेळी उघडा केला. कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे सांगताना ते म्हणाले, की एकीकडे समृद्धी महामार्गावर दरोडे पडतात, तर दुसरीकडे दिल्लीत एका माजी आयएएस अधिकाऱ्याचे थेट अपहरण केले जाते. इतकी हिंमत कोणाची होते? देशात नक्की काय चालले आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित करीत सरकारवर टीकास्त्र सोडले. या वेळी खासदार राजाभाऊ वाजे, महापालिकेतील गटनेते केशव पोरजे, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, जयंत दिंडे, माजी आमदार वसंत गिते व अनिल कदम उपस्थित होते.
‘चंदा चोरी झाली’
राम मंदिर ट्रस्टवर पहिल्यांदा भारतीय वायू सेनेचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. याचा अर्थ राम मंदिरात ‘चंदा चोरी झाली’ हे सरकार मान्य करते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. यापूर्वी लोकांची नियुक्ती कुणी केली होती, त्यासाठी निकष काय लावले, याचे उत्तर भाजपने द्यायला हवे. काम अपूर्ण असताना भाजपने उद्घाटनाची घाई केली. त्याला शंकराचार्यांनीही विरोध केला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली.
फडणवीस दिल्लीची तयारी करीत आहेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेचे प्रश्न सोडविण्यापेक्षा दिल्लीची तयारी करीत आहेत. त्यांना कधीही तिकडून बोलावणे येईल आणि केंद्रात जावे लागेल. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे त्यांनी पूर्णत: पाठ फिरविल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.